राज्यातील 60 अधिकाऱ्यांच्या बदल्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 एप्रिल 2017

मुंबई - भारतीय प्रशासकीय सेवेतील 60 अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी शनिवारी रात्री राज्य सरकारने जाहीर केली. त्यात सध्या तोट्यात असलेल्या मुंबईतील बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी समाजकल्याण विभागाचे सचिव सुरेंद्रकुमार बागडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे बेस्टला तोट्यातून बाहेर काढणे व कर्मचाऱ्यांचे वेतन पुन्हा सुरळीतपणे सुरू करण्याचे मोठे आव्हान बागडेंपुढे आहे.

बेस्टचे सध्याचे महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांची नियुक्ती सहकार विभागाचे आयुक्त म्हणून झाली आहे. "पीएमआरडीए'चे मुख्य कार्यकरी अधिकारी म्हणून काम पाहत असलेले महेश झगडे यांची नाशिकच्या विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अश्विनी जोशी यांची राज्य उत्पादन शुल्कच्या आयुक्तपदी, तर निधी पांडे यांची औंरगाबाद येथील राजीव गांधी योजनेच्या मुख्य कार्यकरी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे विभागीय आयुक्त एस. चोकलिंगम यांची बदली पुण्यात जमाबंदी आयुक्त म्हणून करण्यात आली आहे, तर सहकार आयुक्त चंद्रकात दळवी यांची नियुक्ती पुणे विभागीय आयुक्तपदी झाली आहे.

कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून अविनाश सुभेदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंत्रालयात कामगार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत असलेल्या श्‍वेता सिंघल यांच्याकडे सातारा जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

त्याचबरोबर नितीन गद्रे यांची प्रधान सचिव, पर्यटन आणि सांस्कृतिक, एस. व्ही. आर. श्रीनिवास यांची विशेष कार्यकरी अधिकारी (धारावी पुनर्विकास प्रकल्प), वल्सा नायर-सिंग यांची प्रधान सचिव, सामान्य प्रशासन विभाग, दिनेश वाघमारे यांची सचिव, सामाजिक न्याय, के. एच. गोविंदराज यांची व्यवस्थापकीय संचालक, सिकाम, एकनाथ डवले यांची सचिव, जलसंधारण, राजीव जाधव दुग्धविकास आयुक्त, एस. पी. कडू-पाटील साखर आयुक्त, आर. जी. कुलकर्णी यांची आदिवासी विकास आयुक्त, राजाराम माने महाव्यवस्थापक, मेढा, सुनील केंद्रेकर यांची सहव्यवस्थापकीय संचालक, महावितरण औरंगाबाद, अरुण विधळे यांची उपसचिव, कामगार या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: 60 officers transfer in state