आता मोदींच्या समर्थनार्थ ६१ मान्यवर

पीटीआय
शनिवार, 27 जुलै 2019

दहशतवाद्यांचे समर्थक
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे ठेकेदार असणाऱ्यांच्या दृष्टीने देशाचे ऐक्‍य आणि अखंडता याला काहीच महत्त्व असल्याचे दिसत नाही, वैचारिक अंगाने याचा विचार केला तर या मंडळींनी आधी घुसखोर, फुटीरतावादी आणि दहशतवाद्यांचे समर्थन केले आहे. यामुळे या लोकांमध्ये विरोधाची भावना दिसून येते. याउलट मोदी सरकार मात्र ‘सबका साथ, सबका विकास’ या धोरणाने वाटचाल करत आहे, पंतप्रधानांनी झुंडशाहीचाही निषेध केला असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

झुंडशाहीच्या मुद्यावरून सेलिब्रेटींमध्ये उभी फूट
मुंबई - देशभरातील झुंडशाही आणि अल्पसंख्याकांवरील वाढत्या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त करत तीनच दिवसांपूर्वी देशभरातील आघाडीचे कलाकार, विचारवंत आणि दिग्दर्शकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. आता याच पत्रावरून देशभरातील विविध ६१ मान्यवरांनी विरोधाचा सूर आळवत काही मंडळी निवडक पद्धतीने सरकारविरोधात रोष व्यक्त करत असल्याचा दावा  केला आहे. यामुळे झुंडशाहीच्या मुद्यावरून सेलिब्रेटींच्या गोटात फूट पडल्याचे चित्र दिसून येते.

सरकारसमर्थक मान्यवरांमध्ये अभिनेत्री कंगना राणावत, गीतकार प्रसून जोशी, नर्तिका सोनल मानसिंह, दिग्दर्शक मधूर भांडारकर आणि विवेक अग्निहोत्री यांचा समावेश आहे.

हे पत्र २३ जुलै रोजी लिहिण्यात आलेले असून, यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘‘ देशातील ४९ स्वयंभू संरक्षक आणि बुद्धिवंतांनी लोकशाहीच्या मूल्यांबाबत निवडक पद्धतीने चिंता व्यक्त केली असून, यामधून स्पष्टपणे त्यांची राजकीय भूमिका आणि उद्देश्‍य दिसून येतो. आंतरराष्ट्रीय पातळीवरील भारताची प्रतिमा मलिन करण्याचा या मान्यवरांचा उद्देश्‍य आहे. पंतप्रधानांची काम करण्याची आक्रमक पद्धत, राष्ट्रीयत्व, मानवता तसेच भारतीयत्वाच्या मूल्याला ही मंडळी विरोध करत आहेत.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 61 honorable support of Modi Politics