
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आता २० वर्षांचे (१ ऑगस्ट रोजी वर्धापनदिन आहे.) झाले आहे, देशपातळीवर विद्यापीठ एक रोल मॉडेल बनेल, यादृष्टीने विद्यापीठाचे प्रयत्न आहेत. विद्यापीठातील विविध संकुलांसह संलग्नित महाविद्यालयांमध्ये पदवी, पदव्युत्तरचे शिक्षण पूर्ण करणारे विद्यार्थी केवळ पदव्या घेऊन नोकरी मागणारे नव्हे तर रोजगार देणारे उद्योजक, संशोधक बनतील, असा विश्वास कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी व्यक्त केला. सोलापूर शहर-जिल्ह्यातून तरुणांचे दर्जेदार उच्चशिक्षणासाठी होणारे स्थलांतर आगामी काळात थांबेल, असेही त्यांनी सांगितले.
एकाच जिल्ह्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ म्हणून देशभरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ ओळखले जाते. विद्यापीठात सध्या ११ संकुले असून त्याअंतर्गत तज्ज्ञ प्राध्यापक आहेत. याशिवाय विद्यापीठात कौशल्य विकासाचे १४७ कोर्स सुरू आहेत. त्याअंतर्गत पॅरामेडिकल, शैक्षणिक, एनजीओ अशा १६३ संस्था संलग्न आहेत. विविध संस्थांशी विद्यापीठाने ११ सामंजस्य करार केले असून आणखी पाच करार होतील. या विभागांतर्गत तीन, सहा महिने व एक वर्षाचे कोर्स आहेत. त्यामध्ये नऊ विभाग आहेत. तसेच तंत्रज्ञान संकुलात गतवर्षी नऊ अभ्यासक्रम वाढविले, यंदाही त्यात बी. टेक. बायोटेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी, केमिकल टेक्नॉलॉजी, नॅनो सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी, सायबर सेक्युरिटी, डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲण्ड मशीन लर्निंग अशा अभ्यासक्रमांची वाढ होणार आहे. समाजकल्याण विभागातर्फे विद्यापीठातील ६२ अभ्यासक्रमाच्या शिष्यवृत्ती मिळते.
आगामी काळात विद्यापीठात दिव्यांग, तृतीयपंथांसाठी उच्चशिक्षणाचे नवे संकुल सुरू करण्याचाही प्रस्ताव आहे. रंगभवन येथील विद्यापीठाची अभ्यासिका अद्ययावत केली जाणार आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकातील डॉ. कोटणीस स्मारक विद्यापीठाकडे हस्तांतरित करावे, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे. त्याठिकाणी मोठे भाषा संकुल उभारण्याचेही नियोजन आहे. सर्व विद्यार्थ्यांची माहिती एकत्रित मिळावी, यासाठी विद्यापीठाने १५० टीबी क्षमतेचा डेटा सर्व्हर तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर परीक्षांचे निकाल अचूक लागतील, असेही कुलगुरू डॉ. महानवर म्हणाले.
विद्यार्थ्यांच्या कला व क्रीडा गुणांनाही वाव आणि जॉब फेअरही
विद्यापीठाने ‘पीएम उषा’ योजनेतील अनुदानावर ४८२ एकर परिसरात राज्यातील सर्वात मोठे इनडोअर स्टेडियम उभारले आहे. त्याठिकाणी बहुतेक खेळ विद्यार्थी १२ महिने खेळू शकतील, अशी व्यवस्था आहे. या संकुलाचे संचालक डॉ. अतुल लकडे हे आहेत. याशिवाय आता आउट डोअर स्टेडिअमचेही नियोाजन आहे. दुसरीकडे कला विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी विद्यापीठातर्फे युवा महोत्सव राबवून विद्यार्थ्यांना कलागुण सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. याशिवाय राज्य, देशपातळीवरील अशा स्पर्धांमध्ये देखील विद्यार्थी सहभागी होतात. त्यांचा खर्च विद्यापीठाकडून केला जातो. याशिवाय विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा म्हणून ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल सुरू केले आहे. याच्या मदतीने कौशल्य विकास विभागातर्फे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये जॉब फेअर घेतला जाणार आहे. विद्यापीठात ‘कमवा व शिका’ योजना सुरू त्यासाठी आठ ते दहा लाखांची तरतूद केली आहे.
कौशल्य विकास केंद्राद्वारे १४७ कोर्सेस
तांत्रिक (फोटोग्राफी, फॅशन डिझायनिंग, ब्युटी पार्लर टेक्निशियन, ब्युटी पार्लर)
कॉमर्स मॅनेजमेंट : टॅली, शेअर मार्केट, डिजिटल मार्केटिंग,
संगणकशास्त्र : ऑफिस ॲटोमेशन, पायथॉन, हाडूप, सायबर सिक्युरिटी
आरोग्य : एक्सरे व डायलिसिस टेक्निशियन, ऑपरेशन थिएटर व हेल्थ असिस्टंट, योगा
पारंपरिक : मॉन्टेसरी टिचर, स्पोकन इंग्लिश, फोटोग्राफी, टीव्ही-रेडिओ अँकरिंग, टुरिझम गाईड, डिजिटल जर्नालिझम
नवीन : प्राचीन वस्तू, वास्तू जतन व संवर्धन कोर्स, संस्कृत संभाषण, अनुवाद (मराठी, हिंदी, इंग्रजी), ॲग्री टुरिझम, मेडिकल टुरिझम, ज्येष्ठ नागरिक संगोपन प्रमाणपत्र अभ्यासक्रम, एआय, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, स्टॅटेस्टिक, धार्मिक, सांस्कृतिक पर्यटन मॅनेजमेंट
विद्यापीठातील ११ संकुल
सोशल सायन्स,
रसायनशास्त्र
संगणकशास्त्र संकुल
अर्थ सायन्स
फिजिकल सायन्स (भौतिकशास्त्र)
जैवविज्ञान
तंत्रज्ञान
कला व ललित कला
भाषा
कॉमर्स ॲण्ड मॅनेजमेंट
स्कूल ऑफ अलाईड हेल्थ सायन्सेस
विद्यापीठाचा विस्तार...
सध्याचा कॅम्पस् : ३६ एकर व नवीन कॅम्पस् ४८२ एकर
संलग्नित अभियांत्रिकी कॉलेज : ६
फार्मसी कॉलेज : ३
एकूण संलग्नित कॉलेज : ११५
एकूण प्रवेशीत विद्यार्थी : ७०,०००
वसतिगृह : वसतिगृह २०० मुले व २०० मुलींसाठी स्वतंत्र सोय
३० हजारांवर पुस्तकांचा ग्रंथालयात खजिना
विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज ग्रंथालय असून त्यात विद्यार्थ्यांसाठी वायफाय मोफत आहे. एकूण ३० हजारांहून अधिक पुस्तके त्याठिकाणी आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन माहिती बघण्यासाठी संगणकही उपलब्ध आहेत. याशिवाय यापुढे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महात्मा बसवेश्वर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती संभाजी महाराज, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, या महापुरुषांच्या नावे विद्यापीठात अध्यासन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. आगामी काळात या केंद्रांतर्फे महापुरुषांच्या कार्याविषयी प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याचेही विद्यापीठाचे नियोजन आहे.
पैसा शिक्षणाच्या आड कधीच येत नाही...
सातारा जिल्ह्यातील देवडी (ता. माण) या छोट्याशा गावातील प्रकाशने दररोज सहा किलोमीटर पायी जाऊन शेजारील गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर लोक सहभागातून सुरू झालेल्या रयत शिक्षण संस्थेच्या शाळेतून माध्यमिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढे दहिवडी कॉलेजमधून बीएस्सी आणि पुढे मुंबई विद्यापीठातून उच्चशिक्षण पूर्ण केले. त्याच ठिकाणी संशोधन, पीएच.डी. शिक्षण घेऊन प्रकाश डॉक्टर झाला आणि तेथेच ३२ वर्षे सेवा बजावली. त्यानंतर आता डॉ. प्रकाश महानवर हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. पैसा शिक्षणाच्या आड कधीच येत नाही असा अनुभव त्यांनी घेतला आणि इच्छाशक्ती, कष्ट करण्याची तयारी असेल तर निश्चितपणे ध्येयपूर्ती होऊ शकते, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. सोलापुरातील तरुणांचे ब्रेन उत्तम आहे, पण त्याला प्रोत्साहनाची गरज आहे. त्यानुसार विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी सोलापूर विद्यापीठ शार्क टॅंक (आयडिया, नावीन्यपूर्ण कल्पना देणे) सुरू करण्यात आल्याचेही कुलगुरू म्हणाले.
नवीन शैक्षणिक धोरण खूपच चांगले
नवीन शैक्षणिक धोरणामुळे कला-वााणिज्य, विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे विषय घेऊन शिकता येते. त्यातून ज्ञान वाढेल व नोकरी, रोजगाराच्या भरपूर संधी देखील विद्यार्थ्यांना उपलब्ध होतील. विद्यापीठाने पदवी व पदव्युत्तर पदवीसाठी नवीन शैक्षणिक धोरण लागू केले आहे. सहा-सात वर्षे लागतील बदल दिसायला पण त्याचे परिणाम खूपच चांगले असतील. या धोरणामुळे अभ्यासक्रम किंवा शिक्षणासाठी कोणतीही मर्यादा, बंधन राहिलेले नाही. त्यामुळे संशोधनास वाव मिळेल आणि परिपूर्ण विद्यार्थी घडतील.
- डॉ. प्रकाश महानवर, कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.