
तात्या लांडगे
सोलापूर : इयत्ता आठवीपासून ते उच्च शिक्षण, व्यावसायिक शिक्षणासाठी प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शहर किंवा तालुक्याच्या ठिकाणी शासनाच्या वसतिगृहांमध्ये राहण्याची, जेवणाची मोफत सोय उपलब्ध आहे. सोलापूर जिल्ह्यात मुला-मुलींसाठी १६ वसतिगृहे असून त्याठिकाणी त्यांची सोय करण्यात येणार आहे. सध्या वसतिगृहात राहण्यास इच्छुक असलेल्यांकडून ऑनलाइन अर्ज मागवून घेतले जात आहेत.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक इयत्तेनुसार पाठ्यपुस्तके, स्टेशनरी, स्पर्धा परीक्षेच्या (सीईटी, नीट, एमपीएससी, युपीएसससी) तयारीसाठी पुस्तके, संगणक कक्ष, लायब्ररी, अभ्यासिका, अंतर्गत जीम, भोजन व शुद्ध पिण्याचे पाणी, प्रशस्त स्वच्छ निवासगृहे, क्रीडा साहित्यदेखील त्या वसतिगृहांमध्ये उपलब्ध असणार आहेत. याशिवाय सुरक्षेसाठी २४ तास सुरक्षारक्षक व सीसीटीव्ही कॅमेरेदेखील आहेत. दरम्यान, तालुकास्तरावरील वसतीगृहांमध्ये राहणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दरमहा ५०० रुपयांचा निर्वाह भत्ता दिला जातो. तर जिल्हास्तरावरील वसतीगृहांमध्ये राहणााऱ्या मुलींना दरमहा ६०० रुपयांचा निवार्हभत्ताही दिला जातो. जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांसाठी सध्या वसतीगृहांमधील प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून त्यांनी मुदतीत अर्ज भरावेत, असे आवाहन सहायक समाज कल्याण आयुक्त सुलोचना महाडीक यांनी केले आहे.
सोलापूर जिल्ह्यात ‘येथे’ वसतिगृहे
मुलींसाठी सोलापूर, बार्शी येथे प्रत्येकी दोन आणि अक्कलकोट, पंढरपूर, माढा, अकलूज व करमाळा येथे प्रत्येकी एक अशी नऊ वसतिगृहे आहेत. याशिवाय मुलांसाठी सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, पंढरपूर, बार्शी, कुर्डुवाडी व माळशिरस येथे प्रत्येकी एक, अशी सात वसतिगृहे आहेत.
‘या’ वेबसाइटवरून करा अर्ज
अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्ग, विमुक्त व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, दिव्यांग, अनाथ अशा प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणानिमित्त राहण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात १६ वसतिगृहे आहेत. सोलापूरच्या सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडून विद्यार्थ्यांना वसतीगृहांमध्ये प्रवेश देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी http://hmas.mhait.org या संकेतस्थळावरून अर्ज करता येणार आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांना काही अडचणींसंदर्भात माहिती हवी असल्यास त्यांनी ०२१७-२७३४९५० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक समाजकल्याण आयुक्त सुलोचना सोनवणे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.