तीन- चार नव्हे तर महाराष्ट्रातील 'या' गावात आहेत तब्बल 'इतकी' मंदिरे

aalsand
aalsand

पुणे : महाराष्ट्रात प्रत्येक गावात वेगवेगळी मंदिर आहेत. त्यातील काही प्रसिद्ध मंदिरांना अनेकांनी भेटी दिल्या असतील. पण आपण कधी विचार केलाय का?  एखाद्या छोट्याशा गावात किती मंदिरे असतील? कदाचित चार-पाच किंवा १०- १२. बरोबर ना..? पण एकाच गावात तब्बल १३० मंदिर असतील तर... आहे ना वेगळपणं! सांगली जिल्ह्यात हे गाव आहे. त्या गावाची लोकसंख्या सुमारे ५००० आहे. प्राचीन इतिहास असणाऱ्या या गावाच नाव आळसंद आहे. येथे वेगवेगळ्या देवतांची व प्राचीन मंदिरे आहेत. 'देवळांचे गाव’ म्हणूनच या गावाची ओळख निर्माण होत आहे .

आळसंद गावात प्राचीन इतिहास पाहायला मिळतो. प्राचीन काळात साताऱ्याच्या औंध संस्थानातील हे एक प्रमुख गाव म्हणून ओळखले जात. येथे राजवल्ली पिर व दस्तगिर पिर हे हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतिक आहे. या ठिकाणी सर्व धर्मीय नैवेद्य अर्पण करतात. विशेष म्हणजे ही सगळी मंदिरे वेगवेगळ्या देवदेवतांची आहेत. यामध्ये हेमाडपंथीय मंदिरांचाही समावेश आहे. रामदास स्वामींनी ११ मारुतींची मंदिरे या ठिकाणी बांधली. या मंदिरात वेगवेगळया रुपातील आणि भागातील मारुतींच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सरस्वतीची मूर्ती या ठिकाणी शिळेवर कोरण्यात आल्याचे आढळून येते.

येथील काशी विश्वेश्वर महादेव मंदिर हे हेमाडपंथी मंदिर आहे. सुमारे ३५० वर्षाचे ते जुने आहे. येथील दगडी खांब नक्षीदार आहेत. या ठिकाणी शिव-पार्वती असे पंचमुखी शिवालय आहे. विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर, गणपतीचे मंदिर, मायक्का मंदिर, नागदेवता मंदिर, लक्ष्मी मंदिर, दत्त मंदिर अशी जुन्या काळातील मंदिरे अस्तित्वात आहेत. काही मंदिरे ही २० ते २५ वर्षांमध्ये ग्रामस्थांनी स्वतः ही बांधली आहेत. आळसंदमध्ये या सर्व मंदिरांत मोठ्या भक्तिभावाने पूजा केली जाते. कदाचित देशभरातही अशा प्रकारची फार कमी गावे असतील.

आळसंद गावामध्ये जोगूबाई मंदिर, नागदेवता मंदिर, लक्ष्मी मंदीर, खंडोबा मंदिर, शामराज महाराज मंदिर, सिध्दनाथ मंदिर, दक्षिणमुखी मारुती मंदिर, मरिआई मंदिर, यमाईदेवी मंदिर, जोतिबा मंदिर, राम मंदिर, बिरुदेव मंदिर, ताई आई मंदिर, भवानी मंदिर, वेताळबा मंदिर, दत्त मंदिर, रेणुका मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, महालक्ष्मी मंदिर, बालाजी मंदिर यांसह जुन्या काळातील ३५ ते ४० मंदिरे गावामध्ये आढळतात. या सर्व मंदिराची पुजा अर्चा नित्यनियमाने केली जाते. आळसंद गावात देवांची मंदिरे मोठ्या प्रमाणात असल्याने लोकांना जवळपास सर्व देवांचे दर्शन या ठिकाणी होते. त्यामुळे आळसंद गाव हे देवळांचे गाव म्हणून प्रसिध्द होऊ लागले आहे.

सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात आळसंद हे गाव आहे. या गावात पांढऱ्या मातीचा साठा आहे. आळसंद गावापासून जिल्ह्याचे ठिकाण सांगली सुमारे ६६ किलोमीटरवर आहे. आळसंद गावापासून तालुक्याचे ठिकाण खानापूर सुमारे १२ किलोमीटरवर आहे. खानापूर तालुक्यात विटा कुंदल हायवेवरून ११ किलोमीटरवर आळसंद आहे. या गावाची लोकसंख्या पाच हजारच्या आसपास आहे. आळसंद गाव हे "देवळांचे गाव" म्हणून ओळखले जाते.

आळसंदच्या सरपंच इंदुमती जाधव म्हणाल्या, या गावात अनेक लहान मोठी देऊळ आहेत. काही गोष्टी पूर्वजांनी सांगितल्यामुळे गावात इतके देऊळ का आहेत त्याचे कारण अचूकपणे सांगता येणार नाही. गावातील इतक्या सर्व देवळांची देखरेख त्या त्या मंदिरातील ट्रस्ट आणि पुजारी करतात. वर्षातून या गावातील देवांची २४ कार्यक्रम होतात. प्रत्येक देवाची यात्रा असते. त्यावेळी अनेक भाविक दर्शनास येतात.

आळसंदचे महादेव स्वामी म्हणाले, आळसंद हे औंध संस्थानकालिन गाव आहे. ही गोसावीची पंढर आहे. मिनी पंढरपूर म्हणून ओळखले जाते. गावात १३० मंदीरे आहेत. गावातील लोक गुण्यागोविंदाने नांदत आहे. सिध्दनाथ हे गावाचे ग्रामदैवत आहे.

पत्रकार दीपक पवार म्हणाले, आळसंद हे ऐतिहासिक परंपरा लाभलेले गाव आहे. या गावाचा पुर्वी औंध संस्थानमध्ये समावेश होता. मुंगी पैठण (जि. औरंगाबाद) येथून येऊन या ठिकाणी लोक स्थायिक झाल्याचे जुने जाणकार लोक सांगतात. या गावात सात बुरुज व गावाभोवती संपुर्ण तटबंदी असल्याचे आढळते. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या गावात अनेक जुनी मंदिरे, महाराजांच्या समाधीही येथे पहायला मिळतात. विविध जाती- धर्माचे लोक या ठिकाणी राहत असून सर्व मंदिराची एकत्रित पुजा व धार्मिक कार्यक्रम ते उत्साहाने साजरे करत असतात.

गावातील काही मंदिरे... 

अकरा मारुती मंदिर : हे मंदिर तीनशे ते साडेतीनशे वर्षापासून या ठिकाणी अस्तित्वात असल्याचे येथील लोक सांगतात. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरातील शिळेवर ११ मारुती, बारावा गणपती व तेरावी सरस्वती आदी देवांची मुर्ती कोरलेली आढळते. असे मंदिर महाराष्ट्रात दुर्मिळ असल्याचेही सांगितले जाते. गावातील हिंदू- मुस्लिम बांधव या ठिकाणी हनुमान जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतात.

काशिविश्वेश्वर महादेव मंदिर : हे मंदिर ४०० वर्षापासून अस्तित्वात असल्याने हे जुन्या काळातील हेमांडपंथी मंदिर असून या मंदिरातील दगडी स्तंभाभोवती कोरिव काम केलेले आढळते. या मंदिरात शिवपार्वती, पंचमुखी शिवालय, महादेवाची पिंड, गणपती, नंदी, कासव या मुर्ती आढळतात.

ओढ्यातील महादेव मंदिर : हे मंदिर ३००- ३५० वर्षापासून या ठिकाणी अस्तित्वात असून गावच्या ओढ्यामध्ये हे मंदिर उभा करण्यात आले आहे. या ठिकाणी शंकराची पिंड पहावयास मिळते.

ग्रामदैवत नाथबाबा : आळसंदचे ग्रामदैवत असलेल्या नाथबाबा मंदिराची स्थापना सोळाव्या शतकात करण्यात आल्याचे येथील लोक सांगतात. सिध्दनाथांची मुर्ती असलेल्या या मंदिरात शंकराची पिंड व समोरील बाजूस नंदी व कासव यांच्या मुर्ती आहेत. हे हेमांडपंथी प्रकारातील मंदिर असून या ठिकाणचे स्तंभ व दगडावरती कोरीव काम केलेले आढळते. आळसंदमधील जागृत देवस्थान म्हणून या मंदिराची ओळख आहे.

सती स्वरुपाबाई मंदिर : हे मंदिर ३५० वर्षापासून अस्तित्वात असून या ठिकाणी स्वरुपाबाई नावाची स्री सती गेल्यामुळे हे मंदिर उभे करण्यात आले आहे. या ठिकाणीही शंकराची पिंड व गणपतीची मुर्ती पहावयास मिळते.

गुमानगिरी, लालगिरी व मनषागिरी यांची समाधीस्थळे : सुमारे ३५० वर्षापुर्वी आळसंदमध्ये गोसावी समाजातील गुमानगिरी महाराज, लालगिरी महाराज व मनषागिरी महाराज यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जीवंत समाधी घेतल्याचे येथील लोक सांगतात. या ठिकाणी त्यांची समाधीस्थळे पहायला मिळतात. त्यामुळे पुर्वी या गावाला गोसाव्याची पांढर असेही लोक म्हणत.

ज्ञानेश्वर माऊली मंदिर : हे मंदिर २५ वर्षापुर्वी गावातील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून स्थापन केले आहे. या मंदिरात विठ्ठल -रुक्मिणी मंदिर, संत ज्ञानेश्वर यांच्या मुर्ती असून दरवर्षी या ठिकाणी साप्ताहिक पारायण सोहळ्याचे अयोजन केले जाते.

श्री अष्टविनायक गणेश मंदिर : या मंदिराची स्थापना सात वर्षापुर्वी गावातील दानशूर व्यक्तीमत्व गणपती जाधव (शाहीर) यांनी स्वखर्चातून केली आहे. या मंदिरात गणपती व नंदी य‍ांच्या मुर्ती आहे. आळसंद गावची शोभा वाढवणारे हे मंदिर आहे.

मायाक्का मंदिर : या मंदिराची स्थापना धनगर समाजातील लोकांनी केली आहे. या ठिकाणी मायाक्का देवीची मुर्ती आहे. या मंदिराच्या शेजारी संत बाळूमामा य‍ांची मुर्ती स्थापन करण्यात आली आहे.

लिंगेश्वर महाराज मठ : लिंगेश्वर महाराज हे लिंगदरी (सागरेश्वर अभयारण्य) येथून १९६० मध्ये आळसंद येथे आले होते. त्यावेळी गावातील श्रीपती कुलकर्णी यांनी त्यांच्या मळ्यामध्ये महारांजांना पुजा-अर्चा करण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली. या ठिकाणी गावातील बबन कुंभार (महाराज) वयाच्या १३ व्या वर्षीपासून सेवेत होते. २० मार्च १९९२ साली लिंगेश्वर महाराज य‍ांनी समाधी घेतली. दरवर्षी लिंगेश्वर महाराज मठामध्ये वसंत पंचमी, अक्कलकोट स्वामी पुण्यतिथी, दत्त जयंती, गुरुपौर्णिमा, त्रिपुरारी पौर्णिमा, लिंगेश्वर महाराज पुण्यतिथी, बबन महाराज पुण्यतिथी, पारायण सोहळा असे विविध धार्मिक कार्यक्रम तसेच महाप्रसदाचे आयोजन केले जाते. या ठिकणी बाहेर गावाहून येणार्‍या भक्तांसाठी भक्तनिवास, वाचनालय आदी सोयी उपलब्ध आहेत. निसर्गरम्य असा या मठाचा परिसर आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती अश्वारुढ पुतळा : आळसंद गावच्या वैभवात भर घालणारा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती अश्वारुढ पुतळा दगडी चबुतर्‍यावरती बसविण्यात आला आहे. पाठीमागील बाजूस भव्य कमान असलेले गावचे प्रवेशद्वार व दोन्ही बाजूस बुरुज यांचे कोरीव दगडांत बांधलेले आहेत. हा सर्व खर्च ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून केलेला आहे.  या गावामध्ये गेल्या तीस वर्षापासून शिवजंयती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यानिमित्त शोभेच्या दारुची भव्य आतिषबाजी, लेझीम व पारंपारिक वाद्यासह मिरवणूक काढण्यात येते.

राजवल्ली पिर व दस्तगीर पिर : राजवल्ली पिर व दस्तगीर पिर हे हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतिक आहे. या ठिकाणी सर्व धर्मीय नैवेद्य अर्पण करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com