
अबब..! सोलापूर जिल्ह्यात दोन हजारांच्या ५ लाख नोटा बॅंकेत जमा; १० दिवसांत जमले १०० कोटी
सोलापूर : दोन हजाराच्या नोटा जमा करण्यासाठी ग्राहकांना २३ मे ते ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातून आतापर्यंत तब्बल १०० कोटींच्या नोटा बॅंकांमध्ये जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष बाब म्हणजे ३० सप्टेंबरपर्यंत लोक आपापसातील व्यवहारासाठी या नोटांचा वापर करू शकतात. पण, ३० सप्टेंबरपर्यंत ज्यांच्याकडे दोन हजारांच्या नोटा असतील, त्यांनी बॅंकेत जमा करणे बंधनकारक आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ सप्टेंबर २०१६ रोजी रात्री साडेआठ वाजता नोटाबंदीचा निर्णय घेतला. त्या दिवसाच्या रात्री १२ पासून पाचशे आणि एक हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. त्यानंतर दोन हजारांची नोट चलनात आणली गेली. पण, कोट्यवधींच्या नोटांची छपाई होऊन देखील दोन हजारांच्या नोटा चलनात दिसत नव्हत्या.
या पार्श्वभूमीवर, पुन्हा भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजारांची नोट ३० सप्टेंबरनंतर चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. अनेकांकडे या नोटाच नव्हत्या, काही ठरावीक लोकांकडेच त्या नोटा असल्याचीही स्थिती होती. या निर्णयानंतर सोशल मीडियातून थट्टा-मस्करी देखील झाली. दरम्यान, आता ३० सप्टेंबरपर्यंत दोन हजारांच्या नोटा जमा करण्यासाठी नागरिकांना मुदत देण्यात आली आहे. आतापर्यंत बॅंक ऑफ इंडिया व स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या ट्रेझरी शाखेत १०० कोटींच्या नोटा जमा झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
जिल्ह्यातील ४.९९ लाख नोटा बॅंकेत
दोन जूनपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्राहकांनी ‘एसबीआय’च्या ट्रेझरी शाखेत ३२ कोटी दोन लाख ९४ हजार रुपयांच्या (एक लाख ६० हजार १४७ नोटा) तर बॅंक ऑफ इंडियामध्ये ६७ कोटी ७८ लाख रुपयांच्या (तीन लाख ३८ हजार ९०० नोटा) नोटा जमा झाल्या आहेत. दररोज एका व्यक्तीला दहा नोटाच बदलून घेण्याचे बंधन आहे. आतापर्यंत (२ जूनपर्यंत) जिल्ह्यातून एकूण चार लाख ९९ हजार ४७ नोटा जमा झाल्याचेही बॅंक अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
नोटा बदलासंबंधी या ठळक बाबी घ्या लक्षात...
- ३० सप्टेंबरपर्यंत दोन हजारांच्या नोटा बँकेत जमा करून त्या बदल्यात इतर मूल्यांच्या नोटा मिळतील.
- कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही बँकेतून नोटा बदलून मिळू शकतात. त्या बॅंकेत खाते असावेच असे काही नाही.
- दोन हजाराच्या नोटा असलेल्यांना जवळील कोणत्याही बँकांमध्ये त्या जमा करता येतील.
- रिझर्व्ह बँकेने त्यांच्या १९ प्रादेशिक कार्यालयांमध्येही दोन हजारांच्या नोटा बदलण्याची सोय.
- एका वेळी जास्तीत जास्त २० हजाराएवढ्याच नोटा बदलून मिळतील.
- नोटा बदलण्यासाठी बॅंकांना कोणत्याही प्रकारची फी द्यावी लागत नाही.
- नोटा बदलून घेण्यासाठी संबंधित बँकेमध्ये खाते असणे बंधनकारक नाही; आधार अन् पॅनकार्ड दाखविण्याची गरज नाही.
- दोन हजाराच्या नोटा व्यवहारासाठी ३० सप्टेंबरपर्यंत सुरूच; पण, बॅंकेत जमा झाल्यावर बॅंकेतून कोणालाही दिल्या जात नाहीत