आरक्षणविषयक वक्तव्यामुळे भाजपला डोकेदुखी 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 23 जानेवारी 2017

मुंबई - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य यांचे "जातीवर आधारित आरक्षण संपवा' हे वक्तव्य भारतीय जनता पक्षाच्या अंगलट येण्याची चिन्हे असून, त्याचे पडसाद पाच राज्यांतील विधानसभा तसेच महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या निवडणुकीवर पडणार असल्याची शक्‍यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. 

मुंबई - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य यांचे "जातीवर आधारित आरक्षण संपवा' हे वक्तव्य भारतीय जनता पक्षाच्या अंगलट येण्याची चिन्हे असून, त्याचे पडसाद पाच राज्यांतील विधानसभा तसेच महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या निवडणुकीवर पडणार असल्याची शक्‍यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. 

बिहार विधानसभा निवडणुकीत संघाचे सहकार्यवाह मोहन भागवत यांच्या अशाच आशयाच्या वक्तव्याचा फटका भाजपला बसला होता. बिहारमध्ये भाजपची नाचक्की झाली होती. त्या वेळी भागवत यांच्या वक्तव्याचा फटका भाजपला बसल्याचे भाजप धुरिणांनी मान्य केले होते. नेमकी तशीच राजकीय परिस्थिती असताना मनमोहन यांचे वक्तव्य भाजपला बॅकफुटावर जाण्यास कारणीभूत ठरणार, अशी चिन्हे आहेत. कारण देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या उत्तर प्रदेश राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आहे. या ठिकाणी जातीपातीच्या राजकारणाची समीकरणे अत्यंत प्रबळ ठरतात. उत्तर प्रदेशबरोबर निवडणुका असलेल्या इतर राज्यांप्रमाणे राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीवरही मनमोहन यांच्या आरक्षणविरोधी वक्तव्याचा फटका बसू शकतो. रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर यांनी मनमोहन यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. तसेच, मायावती यांनी जोरदार टीका केली आहे. त्याचप्रमाणे महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत विरोधी पक्ष भांडवल करणार हे मात्र निश्‍चित असल्याचे मानले जाते. त्यातच राज्यात विविध समाजांचे मोठ्या संख्येने मोर्चे निघाले आहेत. अशा स्थितीत आरक्षणविरोधी विधान केल्याने भाजपला याचा विचार करावा लागेल. मुंबईसह राज्यातील महापालिकांत काही मते विजयाचे आकडे बदलवू शकतात, त्यामुळे निवडणुकीच्या रणधुमाळीत नोटाबंदी, आरक्षणविरोधी वक्तव्य भाजपच्या मुळावर उठणार आसल्याचे बोलले जाते. 

जे त्यांच्या पोटात आहे ते ओठात येते, त्यांचे (संघाचे) अंतिम लक्ष्य तेच आहे. 
- सचिन सावंत, कॉंग्रेस प्रवक्ते 

भाजप हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर राज्य करणारा पक्ष असून, आरक्षणास विरोध हा त्यांचा अंतिम अजेंडा आहे. 
- नवाब मलिक, प्रवक्ते, राष्ट्रवादी कॉंग्रेस 

Web Title: About the statement of Reservations