धक्कादायक! देशातील कोट्यावधी विद्यार्थी शाळाबाह्य होण्याचा धोका

मीनाक्षी गुरव
Monday, 14 December 2020

2018च्या तुलनेत हे प्रमाण 3.5 टक्‍क्‍यांनी वाढल्याचे निदर्शनास येत आहे. विद्यार्थी शाळाबाह्य होण्याचे प्रमाण यंदा 5.3 टक्के इतके आहे. 2018च्या तुलनेत हे प्रमाणे 3.5 टक्‍क्‍यांनी वाढले आहे.

पुणे : इयत्ता पाचवीत असणारी दीक्षा शाळा बंद झाल्यानंतर पुण्यातून सोलापूर जिल्ह्यातील आपल्या मूळगावी आई-वडिलांसमवेत गेली. अवघ्या दहा वर्षांची ही दीक्षा पुन्हा शाळेत परतलीच नाही. कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीत तिच्या वडिलांच्या नोकरीवर संकट आले. दरम्यानच्या काळात तिच्या शिक्षणाला मात्र 'लॉक' लागले.

कोरोना काळात पुण्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये नोकरदार, कामागार याबरोबरच ऊसतोड, वीट भट्टी, दगडखाणी येथील कामगारांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले. या स्थलांतरात कुटूंबासमवेत लाखो शालेय विद्यार्थ्यांचेही स्थलांतर झाले आहे. दीक्षाप्रमाणे लाखो विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात म्हणजे गेल्या आठ महिन्यात शाळाबाह्य झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाणे दरवर्षीपेक्षा दुप्पटीने वाढल्याचे तज्ञांचे आणि अभ्यासकांचे म्हणणे आहे. तर 'असर'च्या (ऑक्‍टोबर 2020मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालात देशातील सहा ते दहा वर्ष वयोगटातील जवळपास 5.3 टक्के विद्यार्थी हे यंदा शाळाबाह्य असल्याचे म्हटले आहे.

भारतीयांना लसीबाबत मिळणार मोठा दिलासा! पुनावाला यांनी दिली महत्त्वाची माहिती

2018च्या तुलनेत हे प्रमाण 3.5 टक्‍क्‍यांनी वाढल्याचे निदर्शनास येत आहे. विद्यार्थी शाळाबाह्य होण्याचे प्रमाण यंदा 5.3 टक्के इतके आहे. 2018च्या तुलनेत हे प्रमाणे 3.5 टक्‍क्‍यांनी वाढले आहे. सध्या देशातील कोट्यावधी विद्यार्थी शिक्षणापासून दुरावले असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. कोरोनाच्या संकट काळात यंदा शाळा प्रत्यक्ष सुरू न झाल्यामुळे यंदा प्रवेश प्रक्रियेवर देखील परिणाम झाल्यामुळे, तसेच कोरोनामुळे उद्‌भवलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याचे "असर'च्या अहवालात म्हटले आहे.

अखेर थिएटर गजबजलं! 'एका लग्नाची पुढची गोष्ट' नाटकाचा प्रयोग हाऊसफुल्ल!​

गेल्या 22 वर्षांपासून शांतीवन संस्थेच्या माध्यमात ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी काम करणारे दिपक नागरगोजे (संस्थेचे संस्थापक) "सकाळ'शी बोलताना म्हणाले, "बीड जिल्ह्यातील सहा ते चौदा वर्षे वयोगटातील 90 टक्के विद्यार्थी हे आपल्या कोरोनाच्या काळात पालकांसमवेत स्थलांतरित झाली आहे. जिल्ह्यातील जवळपास 60 हजारांहुन अधिक मुले शिक्षणापासून दूरावली आहेत. दरवर्षी साधारणत: 27 ते 28 हजार विद्यार्थी शाळाबाह्य असल्याचे दिसून येते. यंदा हेच प्रमाण दुप्पट असल्याचे निदर्शनास येत आहे. दरवर्षी ज्या ठिकाणी कुटूंबासमवेत मुले दिसून येतात. त्याठिकाणी शोध घेतला असता, तेथे मुले आणि कुटूंब नसल्याचे दिसत आहे. बीड जिल्ह्यातील ही आकडेवारी पाहता राज्यातील अन्य जिल्ह्यांतील शाळाबाह्य मुलांचे प्रमाणाचा अंदाज घेणे शक्‍य आहे.''

असर अहवालानुसार देशभरातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण (टक्केवारीत):

वयोगट 2018 2020
6 ते 10 वर्षे 1.8 5.3
11 ते 14 वर्षे 3.2 3.9
15 ते 16 वर्षे 12.0 9.9
एकूण 4.0 5.5

ब्लॅकलिस्टेड कंपन्याच करणार सरळसेवा भरती? नव्या वादाला फुटलं तोंड​

कोरोना काळात शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या अनुषंगणाने झालेल्या संशोधनातील महत्त्वाचे मुद्दे :
- 'युनेस्को' नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार जगभरातील 180 देशांमधील जवळपास 2.4 कोटी विद्यार्थी हे शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाण्याचा धोका ऑक्‍टोबर 2020 मध्ये वर्तविण्यात आला.
- कोराना संकटात उद्‌भवलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे 190 देशांमधील जवळपास 2.38 कोटी लहान आणि तरुण मुलांची शाळा सुटली असल्याचे संयुक्त राष्ट्राने (युनायडेट नेशन्स) ऑगस्ट 2020मध्ये प्रसिद्ध केलेल्या 'कोविड-19 काळातील शिक्षण' विषयावरील "पॉलिसी ब्रिफ'मध्ये म्हटले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Above 5 percent six to ten year old students are out of school this year