ब्लॅकलिस्टेड कंपन्याच करणार सरळसेवा भरती? नव्या वादाला फुटलं तोंड

Students_MPSC
Students_MPSC

पुणे : राज्य शासनातील गट क आणि गट ड मधील सरळ सेवेची पदे भरण्यासाठी महाआटी विभागाने ज्या कंपन्यांची निवड केली आहे, त्यातील दोन कंपन्या यापूर्वी बॅकलिस्टेड करण्यात आलेल्या आहेत. तरीही याच संस्थांना काम दिले जाणार असेल, तर लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ आहे, असा आरोप विद्यार्थी संघटनांकडून केला जात आहे.

सरळसेवा पदभरतीसाठी महाआयटी विभागाने निविदा प्रक्रियेत सहभाग घेतलेल्या 18 कंपन्यांच्या तांत्रिक व परीक्षेचा दर याची तपासणी करून चार कंपन्या फायनल केल्या आहेत. त्याचा प्रस्ताव दोन दिवसात शासनाकडे सादर केला आहे. या अपात्र आणि पात्र कंपन्यांची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, महाआयटी विभागातील अधिकाऱ्यांनी त्यास दुजोरा दिला आहे. यापूर्वी महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून भरती करताना त्यात घोटाळा झाला होता. आता पुन्हा ब्लॅक लिस्टेड कंपन्याच पात्र ठरत असल्याने ही निवड प्रक्रिया वादात सापडली आहे. याबाबत महाआयटी विभागाच्या व्यवस्थापकीय संचालिका जयश्री भोज यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. 

"सरळसेवेची भरती पारदर्शक झाली पाहिजे पण ब्लॅकलिस्टेड कंपन्यांना पात्र ठरवले आहे. ज्या कंपनीने "यूपीएससी' परीक्षेचे काम केले, ती मात्र अपात्र ठरली आहे. हा एकप्रकारे राज्यातील लाखो बेरोजगार तरुणांच्या भवितव्याशी खेळ आहे. महाआयटीने पात्र ठरवलेल्या चार पैकी एका कंपनीला उत्तरप्रदेश सरकारने मे 2019 मध्ये, तर दुसऱ्या कंपनीला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 1 जून 2020 ला ब्लॅकलिस्ट केले आहे. त्यामुळे ही निविदा रद्द करून थेट एमपीएससीमार्फतच भरती प्रक्रिया राबवावी.
- महेश बडे, प्रतिनिधी, एमपीएससी स्टुडंट्‌स राइट्‌स

'एमपीएससी'ने सरळसेवेची भरती करण्यास तयार असल्याबद्दल राज्य शासनाला पत्र दिले आहे. तरीही ही पदभरती खासगी कंपन्यांकडूनच केली जात आहे. त्यात आता ब्लॅकलिस्टेड खासगी कंपन्यांची निवड झाल्याने हे सरकार भ्रष्टाचाराला वाव देत आहे का अशी शंका निर्माण होत आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली पाहिजे.''
- राहुल कवठेकर, सदस्य, एमपीएससी समन्वय समिती

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com