अपघातांचा विक्रम करणारी ‘शिवशाही’ थकली!

Shivshahi
Shivshahi

मुंबई - अवघ्या दीड वर्षापूर्वी सेवेत दाखल होऊन तब्बल २३० अपघात करणारी राज्य परिवहन मंडळाची (एसटी) अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त शिवशाही बस आता धापा टाकू लागली आहे. एसटीच्या ताफ्यातील किमान ५० ते ६० शिवशाही बसगाड्या गॅरेजमध्ये नियमितपणे ‘ॲडमिट’ असल्याचे चित्र आहे. या बसगाड्यांचे क्‍लच आणि गिअरबॉक्‍स यांत बिघाड होण्याचे प्रमाण मोठे असल्याचे सांगण्यात येते. शिवशाहीच्या अपघातांप्रमाणेच या तांत्रिक बिघाडांनाही अप्रशिक्षित चालक कारणीभूत असल्याची शंका एसटीच्या कर्मचाऱ्यांकडूनच व्यक्त केली जात आहे.

एसटीच्या ६९ व्या वर्धापनदिनी १ जून २०१७ मध्ये पहिली शिवशाही दाखल झाली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ९७५ शिवशाही रस्त्यावर उतरवण्यात आल्या. त्यातील ४९५ एसटीच्या आणि ४८० खासगी मालकीच्या आहेत. सध्या एसटीच्या मालकीच्या ३४ शिवशाही बस आगारात दुरुस्तीसाठी उभ्या असल्याचे सांगण्यात येते. खासगी शिवशाही गाड्यांची अधिकृत माहिती उपलब्ध नाही, कारण या खासगी शिवशाहीवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाच नाही. परंतु त्यांचीही संख्या तेवढीच असल्याचे एसटीच्या गोटातून सांगण्यात येते. 

शिवशाही सेवेत दाखल झाल्यापासूनचे १९ जीवघेणे अपघात, १९० गंभीर अपघात आणि २१ किरकोळ अपघात पाहता ही बसगाडी प्रवाशांचा कर्दनकाळ तर बनत चालली नाही ना, अशी चर्चा सुरू झाली. या अपघातांना आळा घालण्यासाठी भाडेतत्त्वावरील नव्या शिवशाही बसगाड्यांवर एसटीचेच चालक नेमण्याचा निर्णयही महामंडळाने घेतला. मात्र योग्य प्रशिक्षण नसलेले चालक, तसेच त्यांच्यावरील अतिरिक्त कामाचा ताण हे शिवशाहीच्या अपघातांना ज्याप्रमाणे कारणीभूत असल्याची शक्‍यता वर्तविण्यात येते, त्याचप्रमाणे अशा चालकांमुळेच या बसगाडीत तांत्रिक बिघाड होत असावेत, अशी शक्‍यता एक अधिकाऱ्याने व्यक्त केली.

प्रवाशांच्या जिवाशी खेळ 
एसटी महामंडळ आणि खासगी शिवशाही बसची देखभाल-दुरुस्ती तात्पुरती केली जात असल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. अद्ययावत बसमध्ये अनेक सेन्सर आणि इलेक्‍ट्रॉनिक यंत्रणा असतात; पण त्यांची नियमित दुरुस्ती होत नाही, असे एसटीचे कर्मचारी सांगतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com