कर्तव्य बजावून घरी परतताना जवानाचा अपघाती मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 July 2020

कारगिल येथून कर्तव्य बजावून घराकडे परतत असताना त्यांच्या वाहनाला अपघात झाल्याची माहिती

बार्शी : भारतीय सैन्य सेवेत असलेल्या बार्शी तालुक्यातील वाघाचीवाडी येथील सुपुत्र भास्कर सोमनाथ वाघ (वय 40) या जवानाचा मंगळवारी अपघाती मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. कारगिल येथून कर्तव्य बजावून घराकडे परतत असताना त्यांच्या वाहनाला अपघात झाल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. मात्र, कर्तव्य बजावून परतत असताना ही घटना घडल्याने त्यांना हुतात्मा दर्जा देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

भास्कर वाघ  हे गेल्या 20 वर्षांपासून भारतीय सैन्यसेवेत होते. मूळचे बार्शी तालुक्यातील पाथरीजवळील वाघाचीवाडी गावचे सुपुत्र असलेले भास्कर सोमनाथ वाघ हे कर्तव्य बजावून घराकडे निघाले होते. त्यावेळी त्यांच्या वाहनाचा अपघात झाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. वाघ यांचे कुटुंब सध्या मुलांच्या शिक्षणासाठी पुण्यात राहत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा, आई - वडील असा परिवार आहे. त्यांचे आई-वडील मूळ गावीच राहत आहेत. सुट्टी घेऊन आल्यावर ते नेहमी गावाकडेच येत असे. गावातील मित्र परिवार आणि गावकऱ्यांसोबत त्यांचा जिव्हाळा होता.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी वाघाची वाडी येथेच आणले जाणार आहे. तत्पूर्वी ते गुरुवारी संध्याकाळी पुण्यात आणण्यात येईल. तेथून गावाकडे आणण्यात येणार असल्याची माहितीही त्यांच्या नातेवाईकांनी दिली. शुक्रवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच गावात शोककळा पसरली असून, बार्शी तालुक्यातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accidental death of a soldier who return home from duty