घरपोच दारूविक्रीवर दणका 

मृणालिनी नानिवडेकर
रविवार, 21 एप्रिल 2019

निवडणूक काळात दारूच्या विक्रीला लगाम घालण्यासाठी उत्पादन शुल्क खात्याने धडक मोहीम सुरू केली आहे. परप्रांतातून येणारे दारूचे बेकायदा साठे जप्त करण्याची कारवाई सुरू असतानाच राज्याच्या शहरी भागात रात्री उशीरापर्यंत सुरू राहणारी दारू दुकाने बंद करण्याची मोहीम राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्‍त प्राजक्‍ता लवंगारे वर्मा यांनी हाती घेतली. 

मुंबई : निवडणूक काळात दारूच्या विक्रीला लगाम घालण्यासाठी उत्पादन शुल्क खात्याने धडक मोहीम सुरू केली आहे. परप्रांतातून येणारे दारूचे बेकायदा साठे जप्त करण्याची कारवाई सुरू असतानाच राज्याच्या शहरी भागात रात्री उशीरापर्यंत सुरू राहणारी दारू दुकाने बंद करण्याची मोहीम राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्‍त प्राजक्‍ता लवंगारे वर्मा यांनी हाती घेतली. 

ऑनलाइन विक्रीचा आधार घेत भारतीय बनावटीच्या विदेशी दारूची घरपोच सेवा सुरू असल्याची उदाहरणे समोर आली आहेत. त्यावरही कारवाईचा बडगा उचलत अशा व्यवहारात गुंतलेल्या ऍग्रीगेटर्सना कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जस्ट डायल, आस्क मी आणि गुगल या तीन कंपन्यांनाही मद्यविक्रीबाबत तंबी देण्यात आली आहे. आचारसंहितेचा भंग करणारी किंवा कायदा हातात घेणारी कोणतीही कृती होणार नाही, असे जस्ट डायलने कळवले असल्याचे समजते. अन्य ऍप्सकडेही उत्पादन शुल्क विभाग लक्ष ठेवणार आहे. 

महाराष्ट्रात दररोज 8.20 लाख लिटर बीअरची, तर भारतीय बनावटीच्या 5.5 लाख लिटर विदेशी मद्यविक्री होते. देशी दारूची विक्री 9.60 लाख लिटर इतकी आहे. निवडणुकीच्या काळात या विक्रीत वाढ होते असा अंदाज आहे. प्राजक्‍ता लवंगारे वर्मा यांनी निवडणूक काळातील बेकायदा दारूव्यवहारावर चाप आणणारी कारवाई सुरू केली आहे.

ऑनलाइन विक्रीवर चाप लावणे राज्यातील मतदानाच्या पहिल्या टप्प्यापासून सुरू झाले असल्याचे समजते. पुणे येथे मध्यरात्री दारू दुकाने उघडी दिसल्याने जिल्हा अधीक्षकांवर, तसेच 8 कर्मचारी अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. विभागातील अवैध व्यवहारात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांचे धाबे या कारवाईमुळे दणाणले आहे. 

मतदानानंतरही कारवाई सुरूच 

मतदानाचे टप्पे पार पडल्यानंतरही ऑनलाइन घरपोच विक्री, तसेच मध्यरात्रीचे व्यवहार यावरील कारवाई सुरूच राहणार आहे. सर्व प्रकारच्या दारूची विक्री करणारी परवानाधारक 1685 दुकाने, 12 हजार बीअर बार, तसेच 4500 विदेशी मद्यविक्री, तर 4200 देशीदारू दुकानांवर विभागाचे लक्ष असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्‍विनीकुमार यांना सांगितल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

Web Title: Action on Liquors Home Delivery