माझ्या मतदारसंघातून लढून दाखवा; शिंदे गटातील बड्या नेत्याचं ठाकरेंना ओपन चॅलेंज I Shiv Sena | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aditya Thackeray open challenge Shambhuraj Desai

आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना आव्हान देणं हस्यास्पद आहे. शिंदे साहेब लांब राहू देत आम्ही कार्यकर्ते आहोत.

Shiv Sena : माझ्या मतदारसंघातून लढून दाखवा; शिंदे गटातील बड्या नेत्याचं ठाकरेंना ओपन चॅलेंज

सातारा : CM एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) शिवसेनेतून बंडखोरी करत राज्याचं राजकारण बदलवून टाकलं, त्यामुळं शिंदे गट विरुध्द उध्दव ठाकरे गट असा सामना राज्यात रंगत आहे. त्या-त्या गटाचे नेते एकमेकांविरुध्द आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय.

आता थेट उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनीच आदित्य ठाकरेंना ओपन चॅलेंज दिलंय. गेली सहा महिने आदित्य ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्याशिवाय दुसरं काहीच बोलत नाहीत. त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंना आव्हान देत वरळीतून उभं राहण्याचं आव्हान केलंय. मात्र, आदित्य ठाकरेंनी माझ्या पाटण मतदारसंघात उभं राहून दाखवावं, असं खुलं आव्हान देसाईंनी ठाकरेंना केलंय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी निवडणूक लढविण्याचं आव्हान दिलं होतं. त्यावर मंत्री देसाई यांनी प्रत्युत्तर दिलंय. देसाई पुढं म्हणाले, 'आदित्य ठाकरेंना स्वतः ला आमदार होण्यासाठी वरळीतल्या दोन आमदारांचं तिकीट कापून विधान परिषदेची आमदारकी द्यावी लागली. एका आदित्य ठाकरेंना निवडून आणण्यासाठी त्यांना दोन आमदारकी द्यावी लागली, ही वस्तुस्थिती आहे.'

आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना आव्हान देणं हस्यास्पद आहे. शिंदे साहेब लांब राहू देत आम्ही कार्यकर्ते आहोत. पुन्हा निवडणूक लावायची तयारी असेल, तर त्यांनी पाटणमध्ये येऊन विधानसभेची निवडणूक लढवावी, तसंच निवडून येऊन दाखवावं. ज्यांच्या मागं 50 आमदार व 13 खासदार आहेत, त्यांना आव्हान देण्याची भाषा करु नये. त्यांनी पाटणमध्ये येऊन निवडणूक लढवावी व निवडून येऊन दाखवावं, असं आवाहन मंत्री देसाईंनी दिलं. दरम्यान, मंत्री देसाईंनी आदित्य ठाकरे यांना आव्हान दिल्यामुळं आता चांगलंच राजकारण तापलंय.