सोलापुरात पुन्हा कडक लॉकडाउन! कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाची चतु:सूत्री 

तात्या लांडगे
Monday, 13 July 2020

कोरोनाचा मृत्यूदर नियंत्रणात आणण्याच्या हेतूने शहरातील प्रभाग समित्यांची मदत घेतली जाणार आहे. तसेच त्या-त्या परिसरातील सामाजिक संस्था व झोनमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून प्रबोधन केले जाणार आहे. घरोघरी जाऊन संशयित तथा गंभीर आजार असलेल्यांना ऍन्टीजेन टेस्टसाठी नेण्यात येणार आहे. महापालिकेने चतु:सूत्रीचा कृती आराखडा तयार केला असून त्यासाठी पोलिसांची मदत घेतली जाईल, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्याधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी यांनी दिली. 

सोलापूर : शहरातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखून मृत्यूदर आटोक्‍यात आणण्याच्या दृष्टीने महापालिका व पोलिस प्रशासनाने दहा दिवसांचा कृती आराखडा तयार केला आहे. शहरातील प्रभाग समित्यांचे अधिकारी व कर्मचारी, सार्वजनिक मंडळे व संस्थांसह नगरसेवकांच्या माध्यमातून नागरिकांचे प्रबोधन केले जाणार आहे. मास्कचा वापर करणे, दोघांमध्ये दोन हाताचे अंतर ठेवणे, हात नियमित स्वच्छ करणे आणि लक्षणे असलेल्यांना तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करणे या चतु:सूत्रीचा प्रसार आणि प्रचार केला जाणार आहे. 

हेही वाचा : शासकीय कर्मचाऱ्यांची व्यथा, कोरोनाची भीती अन्‌ बदलीची धास्ती 

कोरोनाबाधितांनी तीन हजारांचा टप्पा ओलांडला असून मृत्यूची संख्याही तीनशे पार झाली आहे. सुरवातीला दाट वस्तीत पोचलेला कोरोना आता अपार्टमेंट, बंगलोजमध्ये विस्तारला आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढू लागला असून, शेवटच्या क्षणी रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्याही लक्षणीय झाली आहे. त्यामुळेच मृत्यूदर वाढू लागल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले. या पार्श्‍वभूमीवर कोरोनाच्या संसर्गाची साखळी खंडित करून लक्षणे असलेल्या व्यक्‍तींवर वेळेत निदान व्हावे, या हेतूने नागरिकांना प्रबोधन, रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट, लक्षणे असलेल्यांवर तत्काळ उपचार, संपर्कातील व्यक्‍तींना शोधून विलगीकरणात दाखल करणे, अशाप्रकारचे कामकाज लॉकडाउनमध्ये केले जाणार आहे. त्यामुळे मागील लॉकडाउनच्या तुलनेत हा लॉकडाउन निश्‍चितपणे यशस्वी होईल, असा विश्‍वास पोलिस व महापालिका प्रशासनाने व्यक्‍त केला आहे. 

हेही वाचा : धक्कादायक ! आयटीआय कॉलेजचा निदेशक वीस हजारांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात 

कोरोनाचा संसर्ग नक्की कमी होईल 
कोरोनाचा मृत्यूदर नियंत्रणात आणण्याच्या हेतूने शहरातील प्रभाग समित्यांची मदत घेतली जाणार आहे. तसेच त्या-त्या परिसरातील सामाजिक संस्था व झोनमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून प्रबोधन केले जाणार आहे. घरोघरी जाऊन संशयित तथा गंभीर आजार असलेल्यांना ऍन्टीजेन टेस्टसाठी नेण्यात येणार आहे. महापालिकेने चतु:सूत्रीचा कृती आराखडा तयार केला असून त्यासाठी पोलिसांची मदत घेतली जाईल, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्याधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी यांनी दिली. 

"आयसीएमआर'कडून मिळेना आयडी-पासवर्ड 
शहर-जिल्ह्यातील दोन लाख व्यक्‍तींची रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार आतापर्यंत नऊ हजार किट उपलब्ध झाले असून 80 टेस्टिंग लॅबची निवड केली आहे. मात्र, मोठमोठ्या खासगी लॅबमध्येही अशा टेस्ट व्हाव्यात यासाठी भारतीय वैद्यक विज्ञान संशोधन केंद्राकडून आयडी व पासवर्ड मिळणे आवश्‍यक आहे. परंतु, त्याबाबत अद्याप काहीच कार्यवाही सुरू नसल्याने महापालिका परिसरातील 15 नागरी आरोग्य केंद्रांमधील लॅबमधून ऍन्टीजेन टेस्ट होतील. "एनएडीएल' मानांकन असलेल्या लॅबमधूनच रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट होणार आहेत. 

पोलिस आयुक्‍तांची संकल्पना अन्‌ नगरसेवकांचा पुढाकार 
शहरात 108 नगरसेवक असून त्यांच्या प्रभागातील संपूर्ण माहिती त्यांना असते. शहरातील विविध परिसरात अनेक सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळे सक्रिय आहेत. त्यांनाही त्यांच्या परिसराची माहिती असल्याने या सर्वांच्या मदतीने प्रभागनिहाय नियोजन करून नागरिकांपर्यंत पोचता येईल, अशी संकल्पना पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी मांडली; जेणेकरून नगरसेवक तथा संबंधित परिसरातील सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या परिचयातील व्यक्‍तींना लॉकडाउनचे (कोरोनाचा संसर्ग कमी करण्याचे) महत्त्व पटवून देता येईल. त्यानुसार महापालिकेने कृती आराखडा तयार केला असून नगरसेवकांनीही आपला प्रभाग कोरोनामुक्‍त करण्यासाठी पुढाकार घेण्याचे ठरविले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Administrations tactic to stop Corona in Solapur