प्रथम वर्ष अभियांत्रिकीला बीएस्सीनंतर प्रवेश

शीतलकुमार कांबळे
शनिवार, 29 एप्रिल 2017

बारावीला गणित विषय असणे अनिवार्य; प्रवेशाचा विचार रिक्त जागांसाठीच

बारावीला गणित विषय असणे अनिवार्य; प्रवेशाचा विचार रिक्त जागांसाठीच
सोलापूर - विज्ञान शाखेतून पदवी (बीएस्सी) मिळविलेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या (बी.ई. व बी. टेक) प्रथम वर्षास प्रवेश मिळणार आहे. यासाठीचा अधिनियम नुकताच महाराष्ट्र सरकारने प्रसिद्ध केला आहे. तंत्र शिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर नियमावलीदेखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

यापूर्वी बीएस्सी झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता असलेल्या विद्यापीठातून पदवी मिळविणे आवश्‍यक असणार आहे. पदवी परीक्षा उत्तीर्ण होताना कमीत कमी 50 टक्के गुण प्राप्त करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र राज्यातील मागास प्रवर्ग व विकलांग व्यक्तींना बीएस्सीनंतर प्रथम वर्ष अभियांत्रिकीला प्रवेश घेण्यासाठी कमीत कमी 45 टक्के गुणांची अट घालण्यात आली आहे. बीएस्सी नंतर प्रथम वर्ष अभियांत्रिकीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास बारावीला गणित विषय असणे अनिवार्य करण्यात आला आहे.

अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश फेऱ्यांनंतर रिक्त झालेल्या जागांवर बीएस्सी पदवीधारकांना प्रवेश घेता येणार आहे. प्रथम वर्षासाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा देण्याचे बंधनकारक असते. मात्र बीएस्सी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेशिवाय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे. मात्र हा प्रवेश सर्व जागांसाठी नसून रिक्त झालेल्या जागांवरच मिळणार आहे. नव्या नियमांचा फायदा विद्यार्थ्यांना महाविद्यालय निवडताना होणार आहे.

बीएस्सी झालेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश मिळतो. अशा विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी प्रथम वर्षाच्या काही विषयांची परीक्षा द्यावी लागते. तसेच महाविद्यालयात थेट द्वितीय वर्षासाठी असणाऱ्या जागा या कमी असतात. यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना आवडीचे महाविद्यालय मिळवताना अडचणी येत होत्या. या नव्या नियमामुळे अभियांत्रिकीची संधी हुकलेल्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष अभियांत्रिकीला प्रवेश मिळणार आहे.

Web Title: admission first year engineering after bsc