

तात्या लांडगे
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेत १९६२ पासून भाजपला स्वबळावर सत्ता मिळाली नव्हती. ही सल यंदाच्या निवडणुकीत भरून निघाली आहे. ६८ पैकी ३९ जागा जिंकत भाजपने पहिल्यांदाच जिल्हा परिषदेत स्वबळावर सत्ता मिळविली आहे. त्यासाठी भाजपचे तीन विद्यमान आमदार, सहा माजी आमदार आणि मित्रपक्षांच्या दोन माजी आमदारांनी मेहनत घेतली. बार्शी तालुक्यात भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी जिल्हा परिषदेच्या सहापैकी सहा जागा जिंकल्या. तसेच तालुक्याच्या पंचायत समितीवरही भाजपचे कमळ फुलविले.
दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि पंढरपूर- मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांनी त्यांच्या त्यांच्या तालुक्यात प्रभावी काम केले. दक्षिण सोलापुरात भाजपला सहापैकी पाच, मंगळवेढ्यात चारपैकी चार, अक्कलकोटमध्ये सहापैकी चार जागांवर यश मिळाले आहे.
दुसरीकडे, मोहोळमध्ये माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वात भाजपला पहिल्यांदाच तालुक्यातील चार जागा मिळाल्या. माजी आमदार यशवंत माने यांचीही मदत झाली. उत्तर सोलापुरात माजी आमदार दिलीप माने, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्या नेतृत्वात भाजपने तीनपैकी तीन जागा जिंकल्या.
माळशिरसमध्ये माजी आमदार राम सातपुते यांनी मोहिते पाटलांशी एकाकी झुंज देत पत्नी संस्कृती सातपुते यांना दहिगाव गटातून निवडून आणले. पिलीव गटातूनही भाजपच्याच उमेदवार विजयी झाल्या. माळशिरसमध्ये मागच्यावेळीही भाजपला दोनच जागा मिळाल्या होत्या.
पंढरपुरात माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासोबत यंदा कल्याणराव काळे, गणेश पाटील यांची साथ होती. पण, मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा पंढरपूर तालुक्यात भाजपच्या चार जागा कमी झाल्या. पंढरपूर तालुक्यात यंदा अवघ्या तीन जागा भाजपला मिळाल्या आहेत. माढ्यात माजी आमदार बबनराव शिंदे, त्यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपला सातपैकी चार जागा मिळाल्या.
करमाळ्यात राष्ट्रवादीचे माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी भाजपला साथ दिली. भाजपच्या रश्मी बागल यांच्यासह तालुक्यात भाजपला दोन जागा मिळाल्या. संजयमामा यांनीही दोन जागा जिंकल्या.
सांगोल्यात शिवसेनेचे माजी आमदार शहाजी पाटील यांनी जिल्हा परिषदेसाठी भाजपला साथ दिली. येथून जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांच्या रूपाने भाजपला एकमेव जागा जिंकता आली. एकूणच, जिल्हा परिषदेच्या ६८ पैकी ५९ जागांवर भाजपचे उमेदवार होते, त्यातील ३८ जागांवर भाजपला विजय मिळाला.
७ पंचायत समित्यांमध्ये पहिल्यांदाच फुलले ‘कमळ’
सोलापूर जिल्ह्यातील ११ पंचायत समित्या आहेत. त्यातील अक्कलकोट, बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, माढा, मोहोळ व मंगळवेढा या सात पंचायत समित्यांमध्ये भाजपचे कमळ फुलले आहे. पंढरपूर पंचायत समितीमध्ये मात्र आठ जागा भाजपला व तेवढ्याच जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या आहेत. आता ‘ईश्वर चिठ्ठी’वर सभापती ठरणार आहे.
महापालिकेनंतर झेडपीतही पालकमंत्री गोरेंचाच ‘जय’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक दिग्गजांच्या सभा सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने होणार होत्या. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर भाजप नेत्यांच्या सभा रद्द झाल्या. त्यानंतर जिल्ह्यातील प्रचाराची संपूर्ण धुरा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी एकहाती सांभाळली. महापालिका निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करता येईल, इतके यश मिळाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.