खेडची सभा गाजवल्यानंतर ठाकरे आता मालेगावात; दादा भुसेंना थेट आव्हान : Uddhav Thackeray | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ratnagiri khed Uddhav Thackeray Sabha Speech

Uddhav Thackeray: खेडची सभा गाजवल्यानंतर ठाकरे आता मालेगावात; दादा भुसेंना थेट आव्हान

मुंबई : रत्नागिरीतील खेडची सभा गाजवल्यानंतर आता शिवसेना नेते उद्धव ठाकरे नाशिकच्या मालेगावमध्ये सभा घेणार आहेत. या सभेद्वारे ते शिवसेना नेते आणि मुख्यंमत्री एकनाथ शिंदेंचे सहकारी दादा भुसे यांना थेट आव्हान देणार आहेत. (After Khed Uddhav Thackeray will hold rally in Malegaon)

शिवसेनेच्या सुत्रांच्या माहितीनुसार, मालेगावात २६ मार्च रोजी सभा होणार आहे. त्यानंतर खासदार नवनीत राणा यांच्या अमरावतीमध्ये देखील ते सभा घेणार आहेत. शिवसेना आमदारांच्या मतदारसंघांमध्येच उद्धव ठाकरेंच्या या सभा पार पडणार आहेत. खेडच्या सभेला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादानंतर आता ते प्रत्येक जिल्हा झाडून काढणार असल्याचं दिसतं आहे. यातून ते ठाकरे गटाचं शक्तीप्रदर्शन करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

दरम्यान, माजी मंत्री प्रशांतदादा हिरे यांचे पुत्र आणि भाजप युवा मोर्चाचे नेते डॉ. अद्वैय हिरे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन नुकताच ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठे धक्के बसल्यानंतर आता ठाकरेंनी भाजपला मोठा धक्का दिल्याचं बोललं जात आहे. डॉ. हिरे हे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आहेत. तसेच ते जिल्हा कृषी औद्योगिक संघाचे चेअरमन देखील आहेत. पण नाशिकच्या शेतकऱ्यांसाठी भाजपनं काहीही केलं नाही, असा आरोप करत हिरे भाजपतून बाहेर पडले आणि ठाकरेंच्या शिवसेनेत दाखल झाले.

पण अद्वैय हिरे यांच्या रुपानं आता ठाकरे गटाला मालेगावात विधानसभेसाठी उमेदवार मिळाला आहे. त्यामुळं मालेगाव बाह्य मतदारसंघातील विद्यमान आमदार आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. त्यात आता उद्धव ठाकरेंच्या सभेमुळं तर भुसे यांच्यावर काय परिणाम होतोय हे पाहणं महत्वाचं आहे.