
Rohit Pawar : "त्या तर माझ्या मोठ्या भगिनी" ; प्रणिती शिंदेंच्या संतापानंतर रोहित पवार नरमले
Rohit Pawar : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा वारंवार पराभव होत आहे. त्यामुळे हा मतदारसंघ आता राष्ट्रवादीला सोडावा. राष्ट्रवादी हा मतदारसंघ लढवू शकतो, असं विधान केले होते. रोहित पवारांच्या या विधानाचा प्रणिती शिंदे यांनी चांगलाच समाचार घेतला होता. त्यानंतर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगले. दरम्यान यावर रोहित पवार यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे.
रोहित पवार म्हणाले, "आमदार प्रणीती शिंदे ताईंच्या वक्तव्यावरून नाराज झालेले कार्यकर्ते आपला राग व्यक्त करत आहेत. पण कुणीही नाराज होऊ नये. त्या माझ्या मोठ्या भगिनी असून त्यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळं आपापसात वाद न करता बेरोजगारी हा आजचा मुख्य प्रश्न सोडवण्यासाठी आपण आपली शक्ती खर्च करूया. राहीला प्रश्न सोलापूरच्या जागेचा तर त्यासंदर्भात दोन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते निर्णय घेतील, मी कुठलाही दावा केला नव्हता, मी केवळ सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनातील भावना बोलून दाखवली होती."
प्रणिती शिंदे काय म्हणाल्या होत्या -
"कोण रोहित पवार? ही त्यांची पहिली टर्म आहे. काहीजणांमध्ये पोरकटपणा असतो. काही दिवस जाऊ द्या त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी येईल" असं म्हणत प्रणिती शिंदेंनी रोहित पवारांना कडक शब्दांत उत्तर दिलं होतं.
सोलापूर लोकसभा मतदारसंघ कोणी लढवयाचा, या संदर्भात महाविकास आघाडीची बैठक येत्या महिना, दोन महिन्यात होईल, असा माझा अंदाज आहे. सोलापूरची जागा काँग्रेसकडेच राहिलं की राष्ट्रवादीने लढवायची, हे देखील त्याच बैठकीत ठरेल, असे विधान आमदार रोहित पवार यांनी केले होते. त्यानंतर सोलापुरात राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस असे वाकयुद्ध रंगले आहे.