
Rohit Pawar : '...तर तुमची जागा धोक्यात येऊ शकते', राष्ट्रवादीचा प्रणिती शिंदेंना थेट इशारा
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा वारंवार पराभव होत आहे. त्यामुळे हा मतदारसंघ आता राष्ट्रवादीला सोडावा. राष्ट्रवादी हा मतदारसंघ लढवू शकतो, असं विधान केले होते. रोहित पवारांच्या या विधानाचा प्रणिती शिंदे यांनी चांगलाच समाचार घेतला होता. त्यानंतर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगले. दरम्यान यावर रोहित पवार यांनी नरमाईची भूमिका घेतली होती.
त्यावर काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. कोण रोहित पवार असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर त्यांच्या या टीकेला उत्तर देताना रोहित पवार यांनी मात्र आपण प्रणिती शिंदे यांना ओळखतो, मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे असं म्हटलं होतं. मात्र हा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश युवक उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांनी हा मुद्दा समोर ठेवत प्रणिती शिंदे यांच्यावर हल्लाओळ केला आहे.
प्रशांत बाबर बोलताना म्हणाले की, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची कारकिर्द जिल्हा परिषद सदस्यापासून सुरू झाली. त्यामुळे रोहित पवार यांच्यावरील टीका राष्ट्रवादी कधीही खपवून घेणार नाही. याउलट पवार कुटुंबामुळेच शिंदे घराण्याची ओळख आहे. सुशिलकुमार शिंदे यांना विचारा पवार कुटुंब काय आहे . प्रणिती शिंदे यांच्या अशा वक्तव्यामुळे त्यांचे सीट धोक्यात येऊ शकते. सुशिलकुमार शिंदे यांना आमदारकीपासून मुख्यमंत्रीपदापर्यंत नेण्यामध्ये पवार कुटुंबीयांचाच हात आहे असं प्रशांत बाबर यांनी म्हटलं आहे.
प्रशांत बाबर पुढे बोलताना म्हणाले की, सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मोहोळ आणि मंगळवेढा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसने सुशील कुमार शिंदे यांना लीड होती. मात्र तुमच्या मतदारसंघातून 33 हजार मतांनी दुसरे उमेदवार आघाडीवर होते. याचं चिंतन करण्याऐवजी तुम्ही रोहित पवार यांच्यावर टीका करत आहात असंही बाबर यावेळी म्हणाले आहेत.