विधान परिषदेच्या दोन जागांसाठी आघाडी-भाजपमध्ये लढत

Sanjay-and-Rajan
Sanjay-and-Rajan

मुंबई - विधान परिषदेचे दोन सदस्य विधानसभेवर निवडून गेल्याने या दोन जागांसाठी आता निवडणूक होत असून, त्यापैकी एका जागेचा उमेदवारी अर्ज महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दौंड यांनी दाखल केला. 

राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे तसेच शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत विधानसभेत निवडून गेल्याने या दोघांची विधान परिषदेतील जागा रिक्त झाली आहे. धनंजय मुंडे यांच्या जागी बीडमधील नेते संजय दौंड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुंडे यांची रिक्‍त झालेली जागा विधानसभा सदस्यांतून निवडून द्यावयाची आहे. या जागेसाठी भाजपने राजन तेली यांना मैदानात उतरविले आहे. सध्या विधानसभेत भाजपचे १०५ तर महाविकास आघाडीचे १६२ आमदार आहेत. काही अपक्ष आमदारांनीही आघाडीच्या बाजूने जाण्याचा निर्णय घेतला असल्याने दौंड सहजपणे निवडून येऊ शकतात. त्यामुळे राजन तेली निवडणुकीच्या मैदानात शेवटपर्यंत राहतात की उमेदवारी अर्ज मागे घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तानाजी सावंत यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून आले होते. सावंत आता उस्मानाबादमधून विधानसभेवर निवडून गेले आहेत. आता त्यांच्या जागी दुष्यंत चतुर्वेदी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून आज दुष्यंत चतुर्वेदी यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. शिवसेनेच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यापूर्वी माणिकराव ठाकरे यांच्या निवासस्थानी तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक पार पडली. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, सतीश चतुर्वेदी, काँग्रेस नेते नितीन राऊत, शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड बैठकीस उपस्थित होते. दुष्यंत चतुर्वेदी यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला. दुष्यंत चतुर्वेदी हे काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे चिरंजीव आहेत. 

भाजपची तयारी
दरम्यान, भाजपकडून सुमित बाजोरिया अर्ज भरणार आहेत. त्यामुळे यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या जागेसाठी आता दुष्यंत चतुर्वेदी विरुद्ध सुमित बाजोरिया अशी लढत होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून माजी आमदार मितेश भांगडिया आणि शिवसेनेचे प्रवक्ते किशोर कन्हेरे यांच्या नावाचीही चर्चा होती. कन्हेरे भाजपच्या गोटात गेल्यास शिवसेनेसाठी हा मोठा फटका असेल, अशी चर्चा होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com