आघाडीच्या आमदारांत संभ्रमाचे वातावरण

Congress-Ncp
Congress-Ncp

मुंबई - काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपच्या वाटेवर असलेले राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार अब्दुल सत्तार आणि वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या विधानांमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या आमदारांमध्ये संम्रभावाचे वातावरण पसरले आहे. 

काँग्रेसमध्ये राहून विविध मंत्रिपदे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते पद मिळवलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसला रामराम केला आहे. तत्पूर्वी विखे यांचे पुत्र सुजय विखे यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देऊन भाजपच्या तिकिटावार खासदारकी मिळवली आहे; तर विखे यांना भाजपमध्ये जाण्याचे वेध लागले असून, पुढील काही दिवसांत त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. विखे यांच्यासोबत काँग्रेसमधील काही आमदार भाजपच्या वाटेवर आहेत. काँग्रेसमध्ये सध्या नावालाच असलेले मराठवाड्यातील 
आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपमध्ये जाण्यास आणखी काँग्रेसचे दहा आमदार इच्छुक असून, ते आपल्या संपर्कात आहेत, अशा आशयाचे विधान केले आहे.

सत्तार यांच्या विधानामुळे काँग्रेसच्या आमदारामध्ये संशयाचे वातावरण आहे. सत्तार यांच्याप्रमाणेच ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा आमदार आपल्या संपर्कात आहेत, असे वक्‍तव्य केले आहे. त्यांच्या वक्‍तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्येही संम्रभाचे वातावरण पसरले आहे. लोकसभा निवडणुकीत ॲड. आंबेडकर यांनी वंचित आघाडीच्या माध्यमातून सर्व लोकसभा मतदारसंघांत उमेदवार उभे केले. त्याचा फटका आघाडीला बसला. ॲड. आंबेडकर यांच्या भूमिकेबाबत आघाडीच्या नेत्यांनी संशय व्यक्‍त केला आहे. आंबेडकर यांच्या वक्‍तव्याबाबत काँग्रेसचे प्रवक्‍ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे, की ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेविषयी नेहमीच संशय निर्माण झाला आहे. वंचित ही भाजपची ‘बी टीम’ म्हणून जन्माला आली असून, पुढेही याचप्रकारे काम करणार आहे. वंचितला ऑक्‍सिजन द्यायचे काम भाजपने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com