‘ॲग्रोवन’तर्फे औरंगाबादेत कृषी प्रदर्शन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

औरंगाबाद - ‘सकाळ-ॲग्रोवन’मार्फत गुरुवारपासून (२७ ते ३० डिसेंबर) आयोजित करण्यात आलेल्या भव्य कृषी प्रदर्शनासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मराठवाड्यासह वऱ्हाड, खानदेश, नाशिक, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हे प्रदर्शन पर्वणी ठरणार आहे.

औरंगाबाद - ‘सकाळ-ॲग्रोवन’मार्फत गुरुवारपासून (२७ ते ३० डिसेंबर) आयोजित करण्यात आलेल्या भव्य कृषी प्रदर्शनासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मराठवाड्यासह वऱ्हाड, खानदेश, नाशिक, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हे प्रदर्शन पर्वणी ठरणार आहे.

औरंगाबादमधील बीड बायपासजवळील जबिंदा ग्राउंडवर सकाळी ११ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत चार दिवस चालणाऱ्या या भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनासाठी शेतकरी, महिला शेतकरी, शेतकरी गट तसेच कृषी आधारित व्यवसायातील मंडळी आवर्जून सहभागी होत आहेत. प्रदर्शनाच्या निमित्ताने यंदा ''लढा दुष्काळाशी'' या संकल्पनेवर आधारित चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यात विविध कृषितज्ज्ञ, शास्त्रज्ञ, अभ्यासक व प्रयोगशील शेतकरी सहभागी होतील. त्यातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शेतीच्या नव्या वाटा शोधण्याची संधी उपलब्ध होणार आहे. प्रदर्शनासाठी विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे.  

प्रदर्शनात कृषी खात्यासह शासनाचे विविध विभाग, कृषी संशोधन संस्था, कृषी विज्ञान केंद्रे, बॅंका, कृषी शिक्षण संस्था, बियाणे, खते, कीटकनाशके, औजारे क्षेत्रातील कंपन्या तसेच ट्रॅक्टर, हार्वेस्टिंग यंत्रे, कापणी यंत्रे, प्रक्रिया उद्योग, पॅकेजिंग, कोल्ड स्टोअरेज उद्योग, ड्रिप, टिश्यू कल्चर क्षेत्रातील नामवंत कंपन्या सहभागी होत आहेत. याशिवाय ऑटोमोबाईल्स, डेअरी, पशुसंवर्धन, पशुखाद्य, नर्सरी, कृषी प्रकाशने, अपारंपरिक ऊर्जा साधनांचे स्टॉल्सदेखील शेतकऱ्यांना बघण्यास मिळणार आहेत. राज्यात यंदा मराठवाड्यासह अनेक भागांत दुष्काळ आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील आदर्श शेती, शेतीपूरक व्यवसायातील तंत्र, प्रयोग व चर्चेतून या प्रदर्शनाच्या निमित्ताने शेतकऱ्याला धीर देण्याचा प्रयत्न ‘अॅग्रोवन''कडून केला जात आहे.

शेतकऱ्यांना दर तासाला बक्षिसे 
अॅग्रोवनच्या कृषी प्रदर्शनाला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना भरपूर बक्षिसे जिंकण्याची संधी आहे. अॅण्डस्लाइट कंपनीकडून यंदा दररोज दरतासाला बॅटरीचे बक्षीस दिले जाणार आहे. तसेच उद्‌घाटनाच्या दिवशी दुपारी रोहित स्टील कंपनीकडून रोटाव्हेटरदेखील जिंकण्याची संधी आहे. प्रदर्शनासाठी असलेली प्रवेशिका भरणाऱ्या शेतकऱ्यांना ही बक्षिसे जिंकण्याची संधी आहे.

एक टनाचा बैल 
शेतीमधील आश्चर्यकारक बाबी प्रदर्शनात बघण्यास मिळतात. यंदा एक टनी बैल आकर्षण ठरणार आहे. एक हजार किलो वजन, सहा फूट उंची आणि दहा फूट लांबीचा हा बैल स्वतंत्र कक्षात ठेवला जाणार असून, तो सशुल्क बघता येईल.

Web Title: Agrowon Agriculture Exhibition