अॅग्रोवन स्मार्ट अॅवार्ड्‌सचे पुण्यात बुधवारी वितरण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मे 2019

लाख संकटे असतानाही अतुलनीय कष्ट, कल्पकता आणि जिद्दीने शेतीत समृद्धीचे मळे फुलवणाऱ्या १३ कर्तृत्ववान शेतकऱ्यांना बुधवारी (८ मे) अॅग्रोवन स्मार्ट अॅवार्ड्‌स प्रदान केले जाणार आहेत. प्रख्यात ग्रामीण साहित्यिक प्रा. डॉ. राजन गवस व राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा होत आहे.

पुणे - लाख संकटे असतानाही अतुलनीय कष्ट, कल्पकता आणि जिद्दीने शेतीत समृद्धीचे मळे फुलवणाऱ्या १३ कर्तृत्ववान शेतकऱ्यांना बुधवारी (८ मे) अॅग्रोवन स्मार्ट अॅवार्ड्‌स प्रदान केले जाणार आहेत. प्रख्यात ग्रामीण साहित्यिक प्रा. डॉ. राजन गवस व राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा होत आहे. 

पुण्यातील बालगंधर्व नाट्यमंदिरात दुपारी साडेचार वाजता होणाऱ्या या रंगतदार पुरस्कार सोहळ्यात नामवंत कलाकार शर्वरी जमेनीस, भार्गवी चिरमुले, स्मिता शेवाळे, मंगेश बोरगावकर, सावनी रवींद्र आदी आपली कला सादर करणार आहेत.

अॅग्रोवन परिवाराने सुरू केलेल्या स्मार्ट अॅवार्ड्‌स वितरण परंपरेचे हे तिसरे वर्ष आहे. अॅग्रोवन स्मार्ट अॅवार्ड्‌सकडे राज्यातील तमाम शेतकऱ्यांचे लक्ष लागून असते. सर्वांसाठी निःशुल्क असलेल्या या सोहळ्याचे प्रायोजक रिहुलीस, निरामय अॅग्रो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड, बोअर चार्जर, महारयत अॅग्रो इंडिया, सिस्टिमा बायो, मारुती सुझुकी सुपर कॅरी हे आहेत.

यंदाचे अॅग्रोवन स्मार्ट अॅवार्ड एकूण १३ श्रेणींमध्ये दिले जात आहेत. या पुरस्कारांसाठी राज्यभरातून प्रस्ताव आले होते.  तज्ज्ञांचा समावेश असलेल्या निवड समितीकडून या प्रस्तावांची छाननी व निवड करण्यात आली आहे. राज्य पातळीवरील महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र असे आहे. प्रत्येकी २५ हजारांचा अॅग्रोवन प्रेरणा पुरस्कार आणि अॅग्रोवन स्मार्ट महिला शेतकरी पुरस्कार या वेळी दिला जाईल. 

यंदा ‘अॅग्रोवन’कडून ‘जलव्यवस्थापन वर्ष’ साजरे केले जात आहे. त्यानिमित्ताने प्रथमच ‘स्मार्ट जलव्यवस्थापक पुरस्कार’ दिला जाणार आहे. याशिवाय ‘अॅग्रोवन स्मार्ट संशोधक पुरस्कार’देखील संशोधक वृत्तीने शेती करणाऱ्या एका शेतकऱ्याला दिला जात आहे. सेंद्रिय शेतीत कर्तृत्व गाजवलेल्या शेतकऱ्याला ‘अॅग्रोवन स्मार्ट सेंद्रिय शेती पुरस्कार’ दिला जाईल. याशिवाय अॅग्रोवन स्मार्ट कृषिपूरक व्यवसाय पुरस्कार, अॅग्रोवन स्मार्ट कृषी उद्योजक पुरस्कार आणि विभागीय पातळीवरील स्मार्ट शेतकरी पुरस्कार (मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण) विजेत्या शेतकऱ्यांना प्रत्येक दहा हजार रुपये, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र दिले जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agrowon Smart Award Distribution in Pune