एअर इंडियाचे नांदेड- अमृतसर- दिल्ली विमानसेवा ३० जूनपर्यंत बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

air india plane

नांदेड- अमृतसर- दिल्ली विमानसेवा 30 जूनपर्यंत बंद

नांदेड : कोरोनाच्या महाभयंकर संकटात बंद झालेली एअर इंडियाची विमानसेवा काही दिवसांपूर्वीच सुरु झाली होती. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ही सेवा तग धरुन असतानाच प्रवाशी संख्या रोडावली. त्यामुळे कंपनीचे नुकसान होऊ लागले. अखेर आठवड्यातून तिन दिवस चालणारी नांदेड- अमृतसर- दिल्ली ही चालणारी विमानसेवा ता. एक मे ते ता. ३१ मेपर्यंत बंद करण्यात आली होती. पुन्हा ही सेवा एक जून ते ता. ३० जूनपर्यंत बंद करण्यात आली आहे. अशी माहिती एअर इंडियाचे नांदेड स्टेशन मॅनेजर गजेंद्र गुट्टे यांनी सांगितले आहे.

गतवर्षीनुसार या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भावाचा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे वाढते लाॅकडाऊन आणि नांदेडचे प्रसिध्द देवस्थान बंद असल्याने नांदेड- अमृतसर- दिल्ली एअर इंडियाची विमानसेवा 31 मेपर्यंत बंद करण्यात आली होती. नांदेडच्या श्री गुरु गोविंदसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन एअर इंडिया कंपनीची विमान सेवा सुरु होती. नांदेड येथे सचखंड गुरुद्वारा असल्यामुळे पंजाब, दिल्ली, अमृतसर, चंदीगड या राज्यातील शिख भाविकांसाठी विमानसेवा सोयीस्कर ठरत असल्याने ही सेवा पहिल्या लाॅकडाऊननंतर सुरु करण्यात आली होती.

हेही वाचा - किनवटमध्ये केंद्र सरकारचा पुतळा जाळला तर नांदेडमध्ये काळे झेंडे दाखवून केला निषेध

गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर वाहतूक सेवा बंद पडली होती. यामध्ये रेल्वे, एसटी बसेस व विमान याचाही समावेश होता. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर वाहतूक सेवा टप्प्याटप्प्याने सुरु झाली. परंतु पुन्हा मार्चमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाला. त्यामुळे याचा परिणाम वाहतुक व दळणवळण सेवेवर जाणवत आहे. याचा फटका विमान सेवेवरही जाणवला. काही दिवस वीस ते बावीस प्रवासी घेऊन एअर इंडिया कंपनीचे विमान नांदेड -अमृतसर- दिल्लीकडे उड्डाण घेऊ लागले. त्यामुळे विमान विमानसेवा तोट्यात येऊ लागल्याने अखेर ता. एक मेपासून ते ता. 31 मेपर्यंत विमानसेवा बंद करण्यात आली होती. त्यात पुन्हा वाढ करुन ही सेवा ता.एक जून ते ३० जूनपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. आठवड्यातून मंगळवार, गुरुवार आणि शनिवार हे तीन दिवस एअर इंडियाचे नांदेड- अमृतसर- दिल्ली हे विमान सुरु होते. परंतू सध्या ही सेवा बंद करण्यात आली आहे.