घरावर फडणवीस आणि ठाकरेंचा फोटो 'ठग' म्हणून लावणारे त्यांच्याच टोळीत- पवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जून 2019

समस्यांचा डोंगर फोडण्याऐवजी सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्ष नेत्यालाच फोडले. विखे यांनी त्यांच्या बंगल्यावर "ठग ऑफ महाराष्ट्र' असं म्हणत देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो लावले होते. आज तेच ठगांच्या टोळीत कसे सामील झाले, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रसचे गटनेते अजित पवार यांनी केला.​

मुंबई: विरोधी पक्षनेता असताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी जनतेच्या समस्यांचा डोंगर सरकारसमोर मांडल्या परंतु त्यांनाच भाजपने फोडले. विखे पाटलांनी 'ठग्ज ऑफ महाराष्ट्र' म्हणत हिणवलं मात्र तेच विखे आज 'ठगांमध्ये' जाऊन कधी बसले तेच आम्हाला कळले नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी लगावला.

राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना अजित पवार यांनी बालभारतीच्या नवीन शिक्षण पद्धतीचे वाभाडे काढले. ही पद्धत विद्यार्थ्यांचे वाटोळे करणारे आहे असेही अजित पवार म्हणाले. विनोद तावडे यांनी शिक्षण मंत्री असताना ही नवीन पद्धत आणली त्यामुळेच त्यांना मुख्यमंत्र्यांनी बाजुला केले आणि शेलारांना शिक्षण मंत्री केले आहे का? असा सवाल करतानाच आता शेलार त्यात दुरुस्ती करतील असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.

जनता व्यक्ती म्हणून कुणाच्या हाती सरकार दिले पाहिजे याचा विचार करते. राज्यपालांच्या अभिभाषणात त्यांनी पुलवामा हल्ल्यातील शहिदांना मानवंदना वाहिली मात्र महाराष्ट्रातील शहीदांचे त्यांच्या कुटुबियांचे प्रश्न तसेच आहेत. राज्यपालांनी महात्मा गांधी यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली मात्र आज काही लोक नथुराम गोडसे याचे उदात्तीकरण करत आहे. हे आपल्या देशाला शोभणारे नाही. हे विचार कुठे तरी थांबवले पाहिजे असेही अजित पवार म्हणाले. 

शिवसेनेने निष्ठावान शिवसैनिकांना डावलून जयदत्त क्षिरसागर यांना मंत्रिपद दिले. हा सामान्य शिवसैनिकांवर अन्याय आहे त्यांनी किती काळ तुमच्या सतरंज्या उचलायच्या असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना लगावला. 5000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप मुख्यमंत्र्यांवर ज्यांनी केला त्यांना मंत्रिमंडळात जागा दिली. जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाला असे ते म्हणाले होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांना स्पष्टीकरण ही देण्यासाठी सांगितले होते त्यावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य करायला हवे अशी मागणीही अजित पवार यांनी केली.

6 मंत्र्यांना यावेळी वगळण्यात आले त्याचे कारण काय ? याचे कारण सभागृहाला कळायला हवे. या मंत्र्यांनी कामे केली नाही की, भ्रष्टाचार केला, की पक्षाला हवे तसे काम केले नाही त्यामुळे यांना वगळण्यात आले का ? हे स्पष्ट व्हायला हवे अशीही मागणी अजितदादा पवार यांनी केली. 

आम्ही सत्तेत असताना 10 कोटी निधी विकासकामांना घेतला तर विरोधी सदस्यांना 5 कोटीचा निधी देत होतो. परंतु सध्या तशी पद्धत वापरली जात नाही. निधीत दुजाभाव सरकारकडून केला जात आहे. त्यामुळे दुजाभाव देवू नका सर्वच दिवस सारखे नसतात हे लक्षात घ्या असेही अजित पवार म्हणाले.

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देतो सांगून अद्याप दिलेली नाही. सरसकट शेततळी देतो सांगून तीसुद्धा दिली नाही. शेतकऱ्यांची फसवणूक, थट्टा केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणीही अजित पवार यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ajit pawar criticized on devendra fadnavis and vikhe in assembly