
'मोदींच्या करिश्म्यामुळे...', अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला
मुंबई : राष्ट्रवादी फक्त एका व्यक्तीचा पक्ष आहे. एक व्यक्ती बोलतो आणि इतरांनी ऐकायचं असतं, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले होते. त्यावरून अजित पवारांनी (Ajit Pawar) चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे. मोदींच्या करिश्म्यामुळे चंद्रकांत पाटलांना संधी मिळाली असल्याचे अजित पवार म्हणाले.
हेही वाचा: राज्यात लोकशाही आहे,अलटीमेटमची भाषा खपवून घेतली जाणार नाही - अजित पवार
अनेक ठिकाणी तीच परिस्थिती आहे. शिवसेना फक्त बाळासाहेब ठाकरे चालवायचे. इतर त्यांना सहकार्य करत होते. आजच्या घडीला जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना देखील मोदींचा करिश्मा आला म्हणून संधी मिळाली. यांना स्वतःमुळे संधी मिळाली नाही. आम्ही पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो. साहेबांचा फोटो लावतो म्हणून आम्हाला मतं मिळतात. सर्वच पक्षात असं चालत असतं. स्टॅलिन, ममता बॅनर्जी, बिजू पटनाईक असे अनेक उदाहरण आपल्याला देता येतील. काँग्रेसमध्ये देखील इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांना बघून जनता साथ देत होती. त्यांच्यानतंर आता मोदींचा करिश्मा दिसत आहे, असं अजित पवार म्हणाले.
अजित पवारांची नाना पटोलेंवर टीका -
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी एक निवेदन केलं, की आमच्या पाठित खंजीर खुपसला. त्यांचं हे वक्तव्य हास्यास्पद आहे. नाना कुठल्या पक्षातून आले माहिती आहे. भाजपने आता त्यांना म्हणावं का, की आमच्या पाठित खंजिर खुपसला. आमचं महाविकास आघाडीचं सरकार आहे. यामध्ये तिन्ही पक्ष काम करतात. जिल्हा पातळीवर जिल्ह्याचे नेते निर्णय घेतात. काँग्रेसने देखील तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी भाजपसोबत युती केली होती. जबाबदार नेत्यांनी वक्तव्य करताना काळजी घ्यावी. सर्वांना सर्वांचा पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. तिन्ही पक्ष एकत्र आले तर बहुमत मिळू शकतं. सरकारमध्ये राहून जनतेचे कामे करता येतात, असंही अजित पवार म्हणाले.
दरम्यान, भाजपने शरद पवारांचा एक व्हिडिओ ट्विट करत पवार हिंदू देव-देवतांबाबत काय बोलत आहे? असं म्हटलं आहे. त्यावरून देखील पवारांनी प्रतिक्रिया दिली असून भाजपचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. साहेबांनी सर्व कविता म्हटली. पण, भाजपने व्हिडिओ एडीट करून ट्विट केला आहे, असं अजित पवार म्हणाले.
Web Title: Ajit Pawar Jibe At Chandrakant Patil Over Party Leadership
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..