

जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी भाजपसह युती करत सरकार स्थापन केल्याननंतर गेल्या वर्षी जुलैमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांना बरोबर घेत अजित पवारही सरकारमध्ये सहभागी झाले. अजित पवार आणि त्यांचा पक्ष महायुतीत सहभागी झाल्यापासून भाजपमध्ये अंतर्गत धुसपूस सुरू झाली आहे.
यापूर्वी लोकसभा निकालानंतर अजित पवार यांना बरोबर घेतल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी वृत्तपत्रांमध्ये लेख लिहित याबाबत नाराजी व्यक्त केली होती. तर आता दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांच्यासमोरच पुणे जिल्हा भाजपच्या उपाध्यक्षांनी अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढण्याची मागणी केली आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यासमोरच भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष आणि बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांनी अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढावे असे म्हटले आहे.
यावेळी बोलताना चौधरी म्हणाले, "कार्यकर्त्यांचे ऐकणार असाल तर अजित दादांना महायुतीतून बाहेर काढा. दादांनी सुभाष बापूंवर अन्याय केलाय, राहुल दादांवर अन्याय केलाय. पालकमंत्री म्हणून ते आमच्या बोकांडी बसले आहेत."
दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत 48 पैकी 30 जागा जिंकल्या तर महायुतीला अवघ्या 17 जागा मिळाल्या. यामध्ये गेल्या निवडणुकीत 23 जागा जिंकणाऱ्या भाजपची अवघ्या 9 जगांवर घसरण झाली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 7 जागा मिळाल्या. तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या रूपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकमेव जागा मिळाली होती.
या निकालानंतर अजित पवार यांना बरोबर घेतल्याने भाजपला फटका बसल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्याचबरोबर भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुका अजित पवारांशिवाय लढण्याची मागणी भाजपकडे केली आहे.
दुसरीकडे गेल्या जुलैमध्ये अजित पवार आणि 40 आमदारांनी शरद पवार यांची साथ सोडली होती. पुढे न्यायालयीन लढाईत राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना मिळाले होते. पक्ष, चिन्ह आणि बहुतांश आमदार सोडून गेले असतानाही शरद पवार यांनी मोजक्या शिलेदारांना बरोबर घेत लोकसभेच्या निवडणुकीत 10 जागा लढवल्या आणि त्यातील 8 जगांवर बाजी मारली.
लोकसभेच्या या निकालानंतर शरद पवारांना सोडून अजित पवार यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांमध्ये चलबिचन सुरू झाली असून, त्यातील अनेक आमदार पुन्हा स्वगृही परतण्यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा राजकीय वर्तूळात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.