अजित पवारांकडून पत्राचा गैरवापर, राज्यपालांना धोका : सिंघवी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्र सरकारविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज (सोमवार) सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी राष्ट्रवादीचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी अजित पवारांनी पाठिंबा म्हणून दिलेले पत्र चुकीचे होते, यामुळे राज्यपालांना धोका देण्यात आल्याचे म्हटले आहे.

नवी दिल्ली : महाराष्ट्र सरकारविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज (सोमवार) सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी राष्ट्रवादीचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी अजित पवारांनी पाठिंबा म्हणून दिलेले पत्र चुकीचे होते, यामुळे राज्यपालांना धोका देण्यात आल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्राच्या राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना दिलेले निमंत्रणपत्र, देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापनेच्या दाव्याचे पत्र आणि बंडखोर नेते अजित पवार यांनी आमदारांच्या पाठिंब्याचे दिलेले पत्र हे दस्तावेज आज (ता. 25) सकाळी साडेदहा वाजता सादर करण्यात आले आहेत. आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. 

सुनावणीदरम्यान सिंघवी म्हणाले, की 24 तासांत बहुमत चाचणी घ्या. जुन्या प्रकरणाचे  आदेश न्यायालयासमोर आहे. अजित पवारांनी दिलेल्या पत्रात कोठेही भाजपला पाठिंबा देणार असल्याचे म्हटलेले नाही. त्यामुळे राज्यपालांना या सर्व प्रकरणात धोका झालेला आहे. त्यामुळे आजच्या आज बहुमत चाचणी व्हायला हवी.

शिवसेनेकडून बाजू मांडताना कपिल सिब्बल म्हणाले, की राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस हे एकत्र आले होते. त्यांनी एकत्र येऊन 22 नोव्हेंबरला पत्रकार परिषदही घेतली होती. त्यानंतर अशी कोणती शिफारस झाली की राष्ट्रपती राजवट हटविण्यात आली. पहाटे पाच वाजता राष्ट्रपती राजवट का हटविण्यात आली. एका रात्री त्यांनी एवढी घाई का केली. अशी कोणती राष्ट्रीय आपत्ती आली होती, की सकाळी आठ वाजता शपथ घेतली. अजित पवारांना पदावरून हटविण्यात आले आहे. त्यामुळे आता बहुमत चाचणी घेण्यात यावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar misuse of letter threat to governor says Singhvi