Ajit Pawar| 'तुम्ही तुमच्या घरात बसून घरच्यांसाठी अल्टिमेटम द्या, आम्हाला सांगू नका' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ajit pawar

'तुम्ही तुमच्या घरात बसून घरच्यांसाठी अल्टिमेटम द्या, आम्हाला सांगू नका'

मुंबई: भोंग्याच्या प्रश्नावरुन सध्या राज्यभर तणाव पसरला असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांना बोलताना राज ठाकरे यांना टोला लगावला. कुणीही कायदा हातात घेऊ नये असा इशाराही त्यांनी बोलताना दिला आहे.

(Ajit Pawar On Loudspeaker Row)

भोंग्याच्या प्रकरणावर ते माध्यमांना बोलत होते. "सध्या राज्यात वातावरण तापलं असून भोंग्यावरुन कुणी अल्टिमेटमची भाषा करु नये. कायदा सर्वांना सारखा असतो, सर्वांना कायद्याचं सारखं पालन करावं लागणार आहे. तुम्हाला अल्टिमेटम द्यायचा असेल तर घरात बसून घरच्यांसाठी द्या, आम्हाला सांगू नका" असा इशारा त्यांनी राज ठाकरे यांना दिला आहे.

(Loudspeaker News)

राज्यात तणाव निर्माण होऊ नये म्हणून गृहखात्याने पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे राज्यात तणाव निर्माण होणार नाही यासाठी जनतेने सरकारला आणि पोलिसांना शांतता व सुव्यवस्था टिकून राहण्यासाठी मदत करण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांनी केलं.

"तीन तारखेला अक्षय्य तृतीयेच्या दिवशीही या प्रकरणाची बरीच चर्चा झाली होती. पण कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर पोलिस कारवाई करणार आहेत. तसेच उत्तरप्रदेशच्या जहांगीरपुरीतल्या मंदीरावरील आणि मशिदीवरीलही भोंगें काढले आहेत. तिथे कुठलेही आदेश दिले नव्हते, त्यांनी फक्त लोकांना आवाहन केलं आणि तेथील लोकांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला." असं ते बोलताना म्हणाले आहेत.

सुप्रीम कोर्टाने २००५ साली निकाल देऊन आवाजाची मर्यादा लागू केलेली आहे, लोकांनी कोर्टाच्या नियमांचे पालन करावे आणि अजूनही ज्या मंदिरांच्या आणि मशिदीच्या भोंग्यांना परवानगी घेतलेली नसेल त्यांनी ती कायदेशीररित्या काढून घ्यावी असं म्हणत कायदा कणी हातात घेऊ नये असा इशारा त्यांनी दिला.

"अगोदर सगळं काही चागलं सुरू होतं, आता हा विषय पुढे आला आणि सगळं काही बिघडलं. शिर्डीच्या साईबाबा मंदीरातली काकड आरतीही आता बंद झाली आहे. न्यायालयाच्या निर्णयाचं तंतोतंत पालन करायचं असेल तर हे होणारंच." असाही टोला त्यांनी लावला आहे.

न्यायव्यवस्थेच्या निर्णयाचं पालन करायचं म्हटलं तर ते नियम सर्व धार्मिक स्थळांना हे नियम लागू होणार आहेत. असं म्हणत कायदा सुव्यवस्था टिकून राहण्यासाठी लोकांनी मदत करावी असं अवाहन त्यांनी माध्यमांना बोलताना केलं.