
गेल्या काही दिवसांपासून राजकीय नाट्य सुरू होते, यामध्ये अजित पवार हे केंद्रबिंदू होते. त्यामुळे सहाजिकच अजित पवार यांच्या भूमिकेकडे राज्याप्रमाणे बारामतीकरांचे लक्ष होते.
बारामती शहर : विधानसभेमध्ये शपथ घेण्यापूर्वी आज अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांची गळाभेट पाहिल्यानंतर आणि अजित पवार अनेक दिवसानंतर प्रथमच माध्यमांसमोर आले आणि ऑल इज वेल ...असा मेसेज दिला त्यामुळे बारामतीकरांनी आनंद व्यक्त केला.
गेल्या काही दिवसांपासून राजकीय नाट्य सुरू होते, यामध्ये अजित पवार हे केंद्रबिंदू होते. त्यामुळे सहाजिकच अजित पवार यांच्या भूमिकेकडे राज्याप्रमाणे बारामतीकरांचे लक्ष होते.
काल रात्री महाराष्ट्र विकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर अजित पवार ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भेटण्यासाठी सिल्वर ओक या निवासस्थानी गेले, तेथूनच यापुढील काळात जे काही घडेल ते चांगले घडेल, असा विश्वास बारामतीकरांना ही वाटला.
आज सकाळी अजित पवार व सुप्रिया सुळे यांची विधानभवनाच्या दारावर झालेली गळाभेट असंख्य बारामतीकरांनी टीव्हीवरून पाहिल्यानंतर पुढील काळात सगळे व्यवस्थित होईल अशी खात्रीच बारामतीकरांना पटली. सत्ता स्थापनेमुळे बारामतीकरांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता, आता अजित पवार पुन्हा एकदा सक्रिय होत असल्याचे पाहून हा आनंद द्विगुणित झाला
आज सकाळी पवार कुटुंबातील एकी अबाधित आहे, ते सिद्ध झाल्यामुळे शहरात आनंदाचे वातावरण होते. बारामतीकर अजित पवारांना राजकारणापासून दूर राहू देणार नाहीत, काल झालेल्या सत्तास्थापनेच्या नाट्यानंतर अजित पवार यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचे सूतोवाच केले होते, मात्र बारामतीकर हे अजित पवारांना सत्तेपासून दूर होऊ देणार नाहीत. असा विश्वास सोशल मीडियाद्वारे अनेक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. अजित पवार यांनी काय करायचे हे ठरवायचा अधिकार बारामतीकरांना आहे कारण बारामतीकरांनी त्यांना भरघोस मतदान करत निवडून दिले आहे, अशा पोस्ट बारामतीकरांनी टाकलेल्या दिसून आल्या.
आता उत्सुकता अजित पवार यांच्या मंत्रिमंडळातील सहभागाची काल संपलेल्या राजकीय नाट्यानंतर आता अजित पवार मंत्रिमंडळात सहभागी होणार का? याबाबत बारामतीकरात उत्सुकता आहे.
अजित पवार हे मंत्रिमंडळात सहभागी होणे आवश्यक असल्याचे मत प्रत्येक बारामतीकराचे आहे , त्यामुळे अजित पवार आता याबाबत नेमका काय निर्णय घेतात याकडे बारामतीकरांचे लक्ष आहे.