या वयात पवार साहेबांसोबतच असायला हवं होत...समस्त बारामतीकर

मिलिंद संगई
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

आज सकाळपासूनच बहुसंख्य बारामतीकर टीव्हीसमोर बसून आहेत. आज न्यायालयात काय होणार, अजित पवार पुन्हा राष्ट्रवादीसोबत जाणार का...शरद पवार त्यांना पुन्हा पक्षात सामावून घेणार का....या सारख्या अनेक शक्यतांवर घराघरातून चर्चा सुरु आहे. 

बारामती शहर : राज्यात काल घडलेल्या राजकीय भूकंपानंतर आज बारामतीत वातावरणात काहीशी तणावपूर्ण शांतता होती. राष्ट्रवादीतून बंड करुन बाहेर पडलेले अजित पवार व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपदावरुन केलेली हकालपट्टी या पार्श्वभूमीवर बारामतीत कार्यकर्त्यांना पुढे काय होणार....हेच समजेनासे झाले आहे. 

दरम्यान, अजित पवार राष्ट्रवादीतून बंड करुन बाहेर पडून भाजपबरोबर जातील याची कार्यकर्त्यांना स्वप्नातही कल्पना नव्हती. ज्येष्ठ नेते शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतलेली भूमिका पाहिल्यानंतर मात्र अजित पवार यांनी बंडांचे निशाण हाती घेतल्याची सर्वांचीच खात्री पटली. काल बारामतीत या बाबत संमिश्र प्रतिक्रीया उमटल्या. अजित पवार यांनी हा निर्णय घ्यायला नको होता, त्यांना महाविकासआघाडीतही उपमुख्यमंत्रीपद मिळणारच होते मग त्यांनी भाजपबरोबर वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न का केला, याचेच कोडे कार्यकर्त्यांना उलगडत नव्हते. 

ज्येष्ठ पदाधिकारी व नेते यांनाही अजित पवार इतका मोठा निर्णय इतक्या अचानक घेतील याची पुसटशीही कल्पना नव्हती. त्यामुळे सर्वांनाच कमालीचा धक्का बसला. साहेब आणि ताई यांच्यासोबतच दादांनी राहून पुढील वाटचाल करायला हवी होती, असे म्हणणारा मोठा वर्ग बारामतीत आहे. 
सत्ता असो वा नसो पण पवार कुटुंबियात फूट पडण्याचेच शल्य बारामतीकरांना अधिक जाणवले.

आज सकाळपासूनच बहुसंख्य बारामतीकर टीव्हीसमोर बसून आहेत. आज न्यायालयात काय होणार, अजित पवार पुन्हा राष्ट्रवादीसोबत जाणार का...शरद पवार त्यांना पुन्हा पक्षात सामावून घेणार का....या सारख्या अनेक शक्यतांवर घराघरातून चर्चा सुरु आहे. 

दादांनी साहेबांसोबतच राहावे -
मी काय म्हातारा झालो आहे का....अजून खूप जणांना कामाला लावायच आहे, अस प्रचारादरम्यान शरद पवार यांनी वारंवार सांगत, एखाद्या युवकाला लाजवेल असा झंझावात राज्यात करत भाजपला जेरीला आणले. सत्ता स्थापनेच्या क्षणी अजित पवार भाजपात गेल्याने पुन्हा एकदा शरद पवार यांना अडचणींना सामोरे जावे लागले. जे उपमुख्यमंत्रीपद अजित पवार यांना तसेही मिळणारच होते, त्याच पदासाठी अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी का केली.....साहेबांच्या सोबत या काळात अजितदादांनी खंबीरपणे उभे राहायला हवे होते, अशीच भावना अनेक बारामतीकरांची आहे. 
अनेक प्रश्न अनुत्तरितच -
अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय या क्षणी का घेतला....राष्ट्रवादीतील सर्वोच्च पद त्यांच्याकडे असताना अचानकच त्यांचे मतपरिवर्तन का झाले....त्यांनी इतका मोठा निर्णय घेताना कोणालाच विश्वासात का घेतले नाही....साहेबांशी त्यांनी या बाबत चर्चा का केली नाही...हे व या सारखे  अनेक प्रश्न बारामतीकरांना पडले आहेत. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार माध्यमांसमोर आलेच नाहीत, त्या मुळे त्यांची या सर्व घडामोडींमागील नेमकी भूमिका काय हेही स्पष्ट झालेले नाही. मात्र जे घडते आहे ते काही बरे नाही, ही बारामतीकरांची प्रातिनिधिक भावना आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar should return to ncp says baramatikars