
कथित सहकार बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांच्या अडचणी वाढणार? तक्रारदारांमध्ये अण्णा हजारे...
मुंबई - महाराष्ट्र राज्य सहकार बँकेतील हजारो कोटींच्या कथित घोटाळा पुन्हा डोकं वर काढणार असं चित्र असून यामुळे विरोधीपक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. वास्तविक पाहता या प्रकरणात अजित पवार यांच्यासह एकूण ७५ जणांना आधीच क्लिनचीट देण्यात आली होती. (Ajit Pawar news in Marathi)
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी दाखल केलेला सी समरी रिपोर्ट आधी रद्द करा, मगच नव्याने तपास सुरू करा, अशी मागणी प्रकरणातील तक्रारदारांनी कोर्टात केली आहे. याबाबत तक्रारदार माणिकराव जाधव यांच्या वतीने रितसर अर्ज न्यायालयात दाखल करण्यात आला असून शालिनीताई पाटील आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावतीने तक्रार अर्ज आज दाखल करण्यात येणार आहे. याबाबत एबीपी माझाने वृत्त दिलं आहे.
काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजलं होतं. त्यामुळे अजित पवार यांच्या अडचणी वाढणार असं चित्र होतं. मात्र मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने या प्रकरणी सी- समरी रिपोर्ट दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अजित पवार यांच्यासह ७५ जणांना क्लिनचीट देण्यात आली होती. मात्र आता राज्यातील सरकार बदललं. त्यामुळे पुन्हा अजित पवारांच्या अडचणी वाढणार अशी चर्चा सुरू झाली होती. त्यातच तक्रारदार माणिकराव जाधव यांनी सी-समरी रिपोर्ट रद्द करण्याची मागणी केली आहे. अण्णा हजारे आणि शालिनीताई पाटील देखील अशीच मागणी करणार आहे. यावर न्यायालय काय निर्णय घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचाः आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....
दरम्यान न्यायालयाने सी समरी रिपोर्ट रद्द केल्यास बँक घोटाळ्याची नव्याने चौकशी सुरू होऊ शकते. त्यामुळे अजित पवारांसह ७५ जणांच्या अडणीत वाढ होण्याची शक्यता आहे.