सत्तासमतोलाचा विस्तार; युवा चेहऱ्यांनाही संधी

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 31 December 2019

महाविकास आघाडीच्या बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर आज मुहूर्त मिळाला. विधान भवनाच्या प्रांगणात आज राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी 26 कॅबिनेट; तर 10 राज्यमंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. तिन्ही पक्षांनी एकही मंत्रिपद राखून न ठेवता मंत्रिमंडळाचा पूर्ण विस्तार केला. शिवसेनेने मात्र पाच माजी मंत्र्यांना डच्चू देत, नव्या चेहऱ्यांना संधी दिली; तर मित्रपक्षांच्या तीन सदस्यांना मंत्रिमंडळात घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला.

मुंबई - महाविकास आघाडीच्या बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर आज मुहूर्त मिळाला. विधान भवनाच्या प्रांगणात आज राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी 26 कॅबिनेट; तर 10 राज्यमंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. तिन्ही पक्षांनी एकही मंत्रिपद राखून न ठेवता मंत्रिमंडळाचा पूर्ण विस्तार केला. शिवसेनेने मात्र पाच माजी मंत्र्यांना डच्चू देत, नव्या चेहऱ्यांना संधी दिली; तर मित्रपक्षांच्या तीन सदस्यांना मंत्रिमंडळात घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विधान भवनाच्या प्रांगणातील या दिमाखदार सोहळ्याला महाविकास आघाडीचे शिल्पकार व "राष्ट्रवादी'चे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. यांच्यासोबत कॉंग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गेही उपस्थित होते. चित्रपट अभिनेते रितेश देशमुख हे बंधू अमित यांच्या शपथविधी सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते.

शरद पवार अजित पवारांना म्हणाले, संधीचं सोनं करा

उपमुख्यमंत्रिपदी पुन्हा अजित पवार यांचीच वर्णी लागली असून, "राष्ट्रवादी'च्या मंत्र्यांमध्ये अजित पवार समर्थकांना योग्य न्याय दिल्याचे स्पष्ट झाले आहे. 
आजच्या या मंत्रिमंडळ विस्तारात तिन्ही पक्षांनी सामाजिक व प्रादेशिक समतोल साधत विस्तार केला. शिवसेनेने मुंबईतील पाच मंत्र्यांना सहभागी करत राजधानीला झुकते माप दिले. "राष्ट्रवादी'ने पश्‍चिम महाराष्ट्राला तब्बल सात मंत्रिपदे बहाल केली. कॉंग्रेसने अपेक्षेप्रमाणे विदर्भाला सर्वाधिक चार मंत्रिपदे देत पक्षविस्ताराला संधीची दारे उघडल्याचे मानले जाते. 

मंत्रिमंडळ विस्तारातील 36 नावे जाहीर; पाहा आहेत कोण-कोण?

आज शिवसेनेच्या 12, "राष्ट्रवादी'च्या 14, तर कॉंग्रेसच्या 10 मंत्र्यांनी शपथ घेतली. यामधे शिवसेनेने 07, कॉंग्रेस 05; तर "राष्ट्रवादी'ने 5 नव्या चेहऱ्यांना संधी दिली. 
आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात तीन महिला मंत्र्यांना संधी मिळाली. यामध्ये "राष्ट्रवादी'च्या आदिती तटकरे, कॉंग्रेसच्या यशोमती ठाकूर व वर्षा गायकवाड यांचा समावेश आहे. शिवसेनेतून मात्र महिला सदस्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. 

दरम्यान, मंत्रिमंडळात मराठा समाजातून शिवसेनेने 8, राष्ट्रवादीने 8; तर कॉंग्रेसने 7 जणांचा समावेश केला. बौद्ध समाजातून कॉंग्रेसने 2 व "राष्ट्रवादी'ने एकाला संधी दिली. आदिवासी समाजातून केवळ एकच मंत्रिपद लाभले असून कॉंग्रेसचे के. सी. पाडवी हे एकमेव आदिवासी समाजाचा मंत्रिमंडळातील चेहरा राहणार आहेत. मुस्लिम समाजातून तिन्ही पक्षांनी मिळून चार मंत्रिपदे दिली आहेत. ओबीसी समाजातील आठ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. यामधे सर्वाधिक 06 जणांना राष्ट्रवादीने संधी दिली आहे. कॉंग्रेस व शिवसेनेने प्रत्येक एका आमदाराला मंत्रिपदाची संधी दिली.

नवे मंत्रिमंडळ 
मुख्यमंत्री - उद्धव ठाकरे, शिवसेना 
उपमुख्यमंत्री - अजित पवार, राष्ट्रवादी 

कॅबिनेट मंत्री 
. एकनाथ शिंदे, शिवसेना 
. सुभाष देसाई, शिवसेना 
. बाळासाहेब थोरात, कॉंग्रेस 
. नितीन राऊत, कॉंग्रेस 
. जयंत पाटील, राष्ट्रवादी 
. छगन भुजबळ, राष्ट्रवादी 
. अशोक चव्हाण, कॉंग्रेस 
. दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी 
. धनंजय मुंडे, राष्ट्रवादी 
. विजय वडेट्टीवार, कॉंग्रेस 
. अनिल देशमुख, राष्ट्रवादी 
. हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी 
. वर्षा गायकवाड, कॉंग्रेस 
. डॉ. राजेंद्र शिंगाणे, राष्ट्रवादी 
. नवाब मलिक, राष्ट्रवादी 
. राजेश टोपे, राष्ट्रवादी 
. सुनील केदार, कॉंग्रेस 
. संजय राठोड, शिवसेना 
. गुलाबराव पाटील, शिवसेना 
. अमित देशमुख, कॉंग्रेस 
. दादा भुसे, शिवसेना 
. जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी 
. संदिपान भुमरे, शिवसेना 
. बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी 
. यशोमती ठाकूर, कॉंग्रेस 
. अनिल परब, शिवसेना 
. उदय सामंत, शिवसेना 
. के. सी. पाडवी, कॉंग्रेस 
. शंकरराव गडाख, अपक्ष 
. असलम शेख, कॉंग्रेस 
. आदित्य ठाकरे, शिवसेना 

राज्यमंत्री 
. अब्दुल सत्तार, शिवसेना 
. सतेज ऊर्फ बंटी पाटील, कॉंग्रेस 
. शंभूराजे देसाई, शिवसेना 
. बच्चू कडू, प्रहार जनशक्ती पार्टी 
. विश्वजित कदम, कॉंग्रेस 
. दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी 
. अदिती तटकरे, राष्ट्रवादी 
. संजय बनसोडे, राष्ट्रवादी 
. प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादी 
. राजेंद्र पाटील यड्रावकर, अपक्ष 

विधान परिषदेतील केवळ दोघेच 
मंत्रिमंडळ विस्तारात विधानसभेतून विजयी झालेल्या बहुतांश आमदारांनाच मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. तिन्ही पक्षांनी विधान परिषदेतील आमदारांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात यश मिळवले असून केवळ शिवसेनेचे अनिल परब व कॉंग्रेसचे सतेज उर्फ बंटी पाटील या दोनच विधान परिषद सदस्यांना मंत्रिपद मिळाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar takes oath as DY CM in Maharashtra Government cabinet expansion