कर्नाटक सीमेवरील गावांच्या विकासास अग्रक्रम देण्याचा ठराव

कर्नाटक सीमेवरील गावांच्या विकासास अग्रक्रम देण्याचा ठराव

यवतमाळ - कर्नाटक सीमेवरील मराठी गावांच्या विकासास अग्रक्रम देण्याच्या मागणीचा ठराव आज ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात करण्यात आला. या ठरावाचे सुचक प्रा. काैतिकराव ठाले पाटील हे असून राजन मुठाणे  हे त्याचे अनुमोदक आहेत. 

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज सीमा भागावर पाचव्या क्रमांकाचा ठराव मांडण्यात आला. त्यामध्ये म्हटले आहे की कर्नाटक सीमेवरील मराठी समाज आपली गावे व शहरे महाराष्ट्रात सामील व्हावे म्हणून आटोकाट प्रयत्न करीत असतात. महाराष्ट्र सरकारच्या व सर्व पक्षीय पुढाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील काही गावे, नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील काही गावे तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील तेरा गावे आपल्या शेजारच्या राज्यातील ग्रामीण भागात झालेला विकास आणि त्यांना मिळणाऱ्या सुखसोयी पाहून शेजारच्या राज्यात सामील होण्याची भाषा उघडपणे करीत आहेत. महाराष्ट्र सरकारने आणि सर्वपक्षीय पुढाऱ्यांनी त्यांच्या विकासाकडे आणि सुखसोयींकडे आतापर्यंत केलेले दुर्लक्ष आणि सध्या करीत असलेले दुर्लक्ष याची या संमेलनाला चिंता वाटते. सर्वपक्षीय पुढाऱ्यांना या संमेलनाचा हा इशारा असून त्यांनी राजकारण सोडून शेजारच्या तेलंगणा व कर्नाटक राज्याच्या सीमेवरील गावांच्या विकासाकडे अग्रक्रमाने लक्ष द्यावे व युद्ध पातळीवर त्यांचे विकासाचे प्रश्न सोडवावे आणि त्यांना आश्वासित करावे अशी मागणी ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य समंलेन करत आहे. 

झुंडशाहीच्या उपद्रवी प्रवृत्तीचा बंदोबस्त करावा

झुंडशाहीच्या उपद्रवामुळे समाजात गंभीर समस्या निर्माण होत आहेत. याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी सात क्रमांकाच्या ठरावाने करण्यात आली. प्रा. मिलिंद जोशी हे या ठरावाचे सुचक असून डाॅ. दादा गोरे त्याचे अनुमोदक आहेत. साहित्य संमेलनात मांडण्यात आलेला हा ठराव असा - आज समाजातील झुंडशाहीचा वाढता उपद्रव निरनिराळ्या क्षेत्रात गंभीर समस्या निर्माण करत आहे. झुंडशाहीने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली असून ही प्रवृत्ती वरचेवर प्रबळ होत असून समाज जीवन गढूळ करत आहे. याची या संमेलनाला गंभीर चिंता वाटते. राज्य व केंद्र शासनाने याची दखल घेऊन व या उपद्रवी प्रवृत्तीचा तातडीने बंदोबस्त करावा. अशी मागणी या संमेलनात करण्यात आली. 

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही ठराव

या संमेलनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही ठराव मांडण्यात आला. कुंडलिक अतकरे हे या ठरावाचे सुचक असून रमेश वंसकर हे त्याचे अनुमोदक आहेत. मांडण्यात आलेला हा ठराव क्रमांक चार असा - महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न हा आज समाजधुरिणांच्या व जाणत्या मराठी मंडळींचा चिंतेचा विषय झाला आहे. केंद्र व राज्यातील सरकार शेतकऱ्यांना दुय्यम वागणूक देत आहे अशी या साहित्य संमेलनाची ठाम समजूत आहे साहित्य संमेलनात सामील झालेल्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या भविष्याची चिंता वाटत आहे. केंद्र व राज्य सरकारने निदान माणूस म्हणून त्यांच्या प्रश्नाकडे पाहावे आणि शेतकऱ्यांनी केलेले उत्पादन तातडीने उचलून त्यांना किमान जाहीर केलेला हमीभाव विनाविलंब देण्यात यावा अशी आग्रहाची मागणी आहे. 

यवतमाळ जिल्ह्यास विशेष दर्जा द्यावा

यवतमाळ जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची तरतूद करून या जिल्ह्यास विशेष दर्जा देण्यात यावा अशीही मागणी या संमेलनात करण्यात आली. प्रा. घनश्याम दरणे हे या ठरावाचे सुचक असून डाॅ. प्रणव कोलते हे त्याचे अनुमोेदक आहेत. संमेलनात मांडण्यात आलेला हा ठराव क्र आठ असा - यवतमाळ जिल्हा आदीवासी आणि भटक्या विमुक्तांची जवळपास ५५ टक्के लोकसंख्या असणारा जिल्हा आहे. विविध क्षेत्रातील त्याचा अनुशेष सुद्धा मोठा आहे. जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेला गती मिळण्यासाठी शासनाने यवतमाळ जिल्ह्याला विशेष दर्जा देत विकासासाठी अधिक निधीची तरतूद करावी अशी मागणी या संमेलनात करण्यात आली. 

वाचन संस्कृती विकासासाठी पुस्तक विक्री केंद्रे हवीत

वाचन संस्कृती विकासासाठी वार्षिक अंदाजपत्रकात विशेष तरतूद करण्याची मागणी या संमेलनात करण्यात आली आहे. या संबंधी झालेल्या ठरावाचे सूचक प्रा. अनंत अट्रावलकर असून त्याचे अनुमोदक डाॅ. अरूंधती वैद्य आहेत. संमेलनात मांडण्यात आलेला हा ठराव क्र. नऊ असा - आज महाराष्ट्रात वाचन संस्कृतीची अवस्था दयनीय झाली आहे. वाचन संस्कृतीच्या विकासासाठी प्रकाशित पुस्तके सर्वदूर पोहचविण्यासाठी प्रदर्शन आणि विक्रीसाठी पुस्तक विक्री केंद्रे अत्यंत कमी आहेत. महाराष्ट्रातील एकूण तालुक्यापैकी ३०० च्या आसपास तालुक्यात पुस्तक विक्री केंद्रे नाहीत यासाठी शासनाने पुढाकार घेऊन प्रत्येक तालुक्यात एक पुस्तक विक्री केंद्र उभारावे. ते वाजवी दराने दीर्घ मुदतीच्या कराराने पुस्तक विक्रेत्यांना उपलब्ध करून द्यावे अशी केंद्रे उभारण्यासाठी शासनाने वार्षिक अंदाजपत्रकात तरतूद करावी अशी मागणी या संमेलनात करण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com