सर्वच पंतप्रधान मस्तीत असतात काय? - उद्धव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

मुंबई - पंडित जवाहरलाल नेहरू नेहमी मस्तीत असत. खुल्या गाडीतून फिरत. त्यांनी "मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही,' अशी घोषणा करताच लोक त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरले. त्यानंतर त्यांनी कधीही खुली गाडी वापरली नाही. सर्वच पंतप्रधान मस्तीत असतात काय, असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता लगावला.

महापालिकेच्या कुलाब्यातील पहिल्या मलजल प्रक्रिया केंद्राचे भूमिपूजन ठाकरे यांच्या हस्ते झाले, त्या वेळी त्यांनी पंतप्रधानांचा 'ड्रीम प्रोजेक्‍ट' असलेल्या परवडणाऱ्या घरांच्या संकल्पनेवरही हल्ला चढवला. किमान भूधारण कायदा करतानाही परवडणारी घरे बांधण्याचा शब्द दिला; पण प्रत्यक्षात किती घरे बांधली याचा हिशेब नाही. त्यानंतर मिठागरांच्या जमिनीवरही परवडणारी घरे बांधण्याची घोषणा झाली. आता पूर्व किनारपट्टीवर परवडणारी घरे बांधण्याची घोषणा करण्यात आली आहे. परवडणारी घरे ही फक्त शब्दांची चलाखी आहे. सर्वसामान्यांची परवड काही थांबत नाही. हा माणूस शक्तिमान असतो, असा चिमटाही ठाकरे यांनी काढला.

महापालिकेच्या कामाची स्तुती करतानाही ठाकरे यांनी नोटा मागे घेण्याच्या निर्णयाबाबत मोदी सरकारला टपली मारली. ते म्हणाले, ""आता नोटांची चणचण जाणवतेय; पण दुष्काळ असतानाही मुंबईत पाण्याची चणचण महापालिकेने जाणवू दिली नाही.''

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डावलून शिवसेनेने हे भूमिपूजन उरकून घेतले. त्यामुळे भाजपने कार्यक्रमावर अघोषित बहिष्कार घातला होता. त्यावरून रंगलेल्या चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना या कार्यक्रमाला यायचे होते; पण त्यांना वेळ नव्हता. त्यांच्यासाठी मुंबईचे काम थांबवू नका, असे त्यांनी सांगितल्यावर हे भूमिपूजन केले. पण, यानंतरही अनेक कार्यक्रम होणार आहेत. त्या वेळी आम्ही एकत्र असू.

Web Title: all pm are in masti?