युती काडीमोडीचा परिणाम उत्तर प्रदेशातही होणे शक्‍य

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 28 जानेवारी 2017

मुंबई - राज्यातील स्थानिक संस्था निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर या काडीमोडीचे आणि मुंबई महापालिका निवडणुकीतील निकालाचे उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीवर पडसाद उमटण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

मुंबई - राज्यातील स्थानिक संस्था निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर या काडीमोडीचे आणि मुंबई महापालिका निवडणुकीतील निकालाचे उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीवर पडसाद उमटण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

देशपातळीवर "एनडीए' अस्तित्वात आल्यापासून शिवसेना हा भाजपचा सर्वांत जुना मित्रपक्ष असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे राज्यातील युतीकडे देशभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. तसेच राजकीयदृष्ट्या महाराष्ट्र व उत्तर प्रदेशची काही समीकरणे असल्याची बाब लपून राहिली नाही. उत्तर प्रदेशासह, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड येथील निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीसाठी भाजपच्या दृष्टीने राज्यातील शिवसेना-भाजपची युती महत्त्वाची आहे. आता युती तुटल्यानंतर या मुद्द्याचा भाजपविरोधक अन्य राज्यांतील निवडणुकीत खुबीने वापरण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

मुंबई महापालिकेसह राज्याभरातील अन्य महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार आहेत. उत्तर प्रदेशातील पाचव्या, सहाव्या आणि सातव्या टप्प्यांतील मतदान राज्यातील निवडणुकीनंतर होणार आहे. त्यामुळे राज्यातील निकालाचा परिणाम या मतदानावर होणार असल्याचा राजकीय विश्‍लेषकांचा अंदाज आहे.

मुंबईत उत्तर भारतीयांची संख्या लक्षणीय आहे. त्यांच्या मतासाठी सर्व पक्ष मुंबईत जोर लावणार असले, तरी अखेर महापालिकेत सत्ता कोणाची येणार अथवा सगळ्यात जास्त नगरसेवक कोणाचे येणार, यावरही उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची समीकरणे बदलणार आहेत. या निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशवासीयांनी मुंबईत साथ दिली तर त्यांच्या मूळ गावी, म्हणजे उत्तर प्रदेशातही भाजपला मदत करण्याची शक्‍यता बळावत जाणार आहे. या उलट मुंबईत उत्तर भारतीयांची मते कॉंग्रेसच्या पारड्यात गेली तर उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्ष-कॉंग्रेस आघाडीला त्याचा चांगला फायदा होण्याची शक्‍यता आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर उत्तर प्रदेशातील मतदानाचे काही टप्पे आहेत. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालाचे पडसाद तेथील विधानसभा निवडणुकीवर पडणार आसल्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

Web Title: Alliance affected on uttarpradesh