उद्धव यांच्या नेतृत्वाखाली आघाडीचे सरकार स्थिर; महाविकास आघाडीच्या नेत्यांना विश्वास 

उद्धव यांच्या नेतृत्वाखाली आघाडीचे सरकार स्थिर; महाविकास आघाडीच्या नेत्यांना विश्वास 

मुंबई - राज्यावर कोरोनाच्या साथीचे संकट अधिक गडद होत असताना राजकीय गाठीभेटींना उधाण आले असून त्याचा केंद्रबिंदू राजभवन ठरले आहे. राज्य सरकार स्थिर की अस्थिर या बरोबरच राज्यावर राष्ट्रपती राजवट लादली जाणार का या चर्चेच्या वावड्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारला कोणताही धोका नसून, हे सरकार आपला कालावधी पूर्ण करेल, असा निर्वाळा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिला आहे. 

आधी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राज्यपालांची भेटी घेतली व त्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. सत्ता स्थापनेच्या धामधुमीतही पवार मातोश्रीवर गेले नव्हते. त्यामुळे भुवया उंचावल्या गेल्या होत्या. राज्यपाल कोशियारी यांच्या भेटीबाबत भाष्य करताना पवार म्हणाले की, भगतसिंह कोशियारी हे राज्यपाल झाल्यापासून त्यांची एकदाही भेट झाली नव्हती . त्यांनी चहासाठी दोन वेळा निमंत्रण दिले होते. म्हणून काल त्यांना भेटायला गेलो होतो. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रात चांगले काम करीत आहेत. तसेच तुम्ही सगळे एकत्र येऊन चांगले काम करत आहात, असे राज्यपाल यावेळी म्हणाल्याचेही पवार यांनी सांगितले. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उपाययोजनांचा आढावा घेतला  
उद्धव ठाकरे यांच्या भेटीबाबत पवार म्हणाले, ``कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मी नियमित आढावा घेत आहोत. यासाठी आमच्या भेटी होत आहेत. राज्यपालांच्या भेटीनंतर काल मीच मातोश्रीला येतो असे उद्धव ठाकरे यांना सांगितले होते. बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर एकदाच मातोश्रीवर गेलो होतो. या भेटीत यावेळी कोरोना साथीबाबत आढावा घेतला. कोरोनाच्या संकटात कशी काळजी घेतली पाहिजे याची चर्चा झाली. कुठे किती रुग्ण आहेत? पावसाळ्यात काय काळजी घ्यायची? रुग्ण संख्या वाढते आहे यावर चर्चा झाली.`` 

यावेळी बाळासाहेबांच्या आठवणींसह इतर गप्पा झाल्या असेही पवार म्हणाले. ``सध्या राजकारणाचा विषय नाही. या काळात कोण राजकीय बोलणार?`` अशीही पुष्टी पवार यांनी जोडली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सरकार स्थिर 
राज्यसरकारबद्दल बोलताना पवार म्हणाले, `` उद्धव ठाकरे सरकार स्थिर आहे. या सरकारला पाठिंबा देणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना पक्ष महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहेत. या कोरोनाच्या महामारीतून महाराष्ट्राला बाहेर कसे काढायचे, यासाठी सगळी ताकद पणाला लावायची हे सध्या उद्दिष्ट आहे. तिन्ही पक्षाची हीच भूमिका आहे.`` 

गदारोळाचे कारण नाही ः राऊत 
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या गाठीभेटीवर आपले मत मांडले ते म्हणाले, ``महाराष्ट्रात सत्तेचे शिल्पकार तसेच मार्गदर्शक हे शरद पवार आहेत. त्यांच्या मातोश्री भेटीवरून गदारोळ व्हायचे काहीच कारण नाही. महाविकासआघाडीचे सरकार पाच वर्ष पूर्ण करेल. पुढील पाच वर्षांसाठी येणाऱ्या निवडणुका आम्ही एकत्र लढणार आहोत.`` 

सरकार अपयशी ः राणे 
राज्यातले सरकार कुचकामी ठरले आहे म्हणून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी भाजपचे खासदार राणे यांनी केली. राणे म्हणाले, ``या सरकारमध्ये प्रशासन नाही. तुम्ही केंद्रावर कशाला बोट ठेवता? कामगार कुठून आणणार? त्यांना अन्न-धान्य दिले का तुम्ही? सरकार स्थिर आहे तर, घाबरता का? महाराष्ट्र सरकार कोरोना रोखण्यात अपयशी ठरले आहे. लोकांचे प्राण हे सरकार वाचवू शकले नाही.`` 
राणे यांच्या मागणीला भाजपातूनच छेद मिळाला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनीच राणे यांच्या मागणीवर भाष्य करताना म्हटले की, राणेंची राष्ट्रपती राजवटीची मागणी ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही. 

कोरोनावर लस आणि ठाकरे सरकार पाडण्याचा डोस विरोधकांना सापडायचा आहे. "संशोधन जारी है". विरोधकांनी तात्काळ "क्वारंटाईन" व्हावे हेच बरे! महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील. कुणी सरकारच्या स्थिरतेबाबत धुरळा उडवत असेल तर ती निव्वळ पोटदुखी समजावी. सरकार मजबूत आहे. 
- संजय राऊत, शिवसेना नेते 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com