PM मोदींच्या सुरक्षेबाबत उद्धव ठाकरे म्हणतात, 'याआधीच दोन पंतप्रधान...' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray and PM Modi

PM मोदींच्या सुरक्षेबाबत उद्धव ठाकरे म्हणतात, 'याआधीच दोन पंतप्रधान...'

चंडीगड : पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेला खिंडार पडल्याच्या घटनेचे आज राजकीय वर्तुळात दुसऱ्या दिवशीही तीव्र पडसाद उमटले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर गंभीर चिंता व्यक्त केली. दुसरीकडे आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आत याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आहे. यासंदर्भातील माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्विटरवरुन दिली आहे.

हेही वाचा: मोठा निर्णय! विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या खर्चाची मर्यादा वाढणार

संजय राऊत यांनी ट्विट केलंय की, पंतप्रधान संपूर्ण देशाचे असतात. त्यांच्या सुरेक्षेबाबत कोणतीच तडजोड होता कामा नये.पंजाब दौऱ्यात मोदी यांच्या सुरक्षेत आढळलेल्या त्रुटी गंभीर आहेत. याच त्रुटींमुळे देशाने दोन पंतप्रधान गमावले आहेत. या घटनेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

उच्चस्तरिय समितीची स्थापना

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौऱ्यातील सुरक्षेसंबंधीच्या त्रुटींची सखोल चौकशी करण्यासाठी पंजाब सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. ही समिती सुरक्षाविषयक त्रुटी शोधून काढण्याचे काम करेल, या समितीला येत्या तीन दिवसांमध्ये राज्य सरकारला अहवाल सादर करणे बंधनकारक असेल. या समितीमध्ये निवृत्त न्यायाधीश मेहताबसिंग गिल, मुख्य सचिव, गृहसचिव आणि न्या. अनुराग वर्मा यांचा समावेश आहे. दुसरीकडे केंद्र सरकारने स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी) कायद्यान्वये जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची तयारी चालविली असून केंद्रीय पातळीवरून देखील वेगळ्या चौकशीचे आदेश दिले जाऊ शकतात.

हेही वाचा: राज्यातील रुग्णसंख्या वाढतीच! दिवसभरात 36 हजारहून अधिक रुग्ण

फिरोझपूरजवळ शेतकरी आंदोलकांनी रस्ता रोखून धरल्याने पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा येथील उड्डाणपुलावर अडकून पडला होता. या आंदोलनामुळे मोदींना फिरोझपूर येथील जाहीर सभा देखील रद्द करावी लागली होती. भाजपने या मुद्यावरून राज्य सरकारवर टीका केली असून केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबत पंजाब सरकारकडून अहवाल मागविला आहे. राज्याचे मुख्यमंत्री चरणजितसिंह चन्नी यांनी मात्र पंतप्रधानांच्या सुरक्षेमध्ये कोणतीही त्रुटी राहिली नव्हती असा दावा केला आहे. राज्य सरकारने या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले असून त्यातून सत्य बाहेर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधानांच्या दौऱ्यातील सुरक्षाविषयक त्रुटींचा मुद्दा आज सर्वोच्च न्यायालयामध्येही पोचला. एका स्वयंसेवी संस्थेने याबाबत याचिका सादर केली असून त्याबाबत त्यावर उद्या (ता.७) सुनावणी होण्याची शक्यता आहे.

प्रदेश भाजप आक्रमक

पंजाब भाजप या मुद्यावरून आक्रमक झाला असून मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटची बैठक बोलवावी आणि राज्याच्या गृहमंत्र्यांना बडतर्फ केले जावे अशी मागणी केली आहे. प्रदेश भाजपच्या नेत्यांनी आज राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची भेट घेत याबाबत त्यांच्याशी चर्चा केली. भारतीय किसान युनियन क्रांतिकारीचे अध्यक्ष सुरजीतकुमार फूल यांनी मात्र आंदोलक शेतकऱ्यांना पंतप्रधान मोदींचा रस्ता माहिती नव्हता असा दावा केला आहे.

माजी अधिकाऱ्यांचे पत्र

देशातील सोळा माजी पोलिस महासंचालक आणि 27 आयपीएस अधिकाऱ्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून पंतप्रधानांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. मोदींचा ताफा रोखणाऱ्या आंदोलकांवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणीही या पत्रात करण्यात आली आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top