केंद्रीय गृहमंत्री शहा साधणार जनतेशी संवाद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सहभागी होणार आहेत. या दरम्यान ते नागपूर आणि भंडारा जिल्हा पालथा घालून जनतेशी संवादसुद्धा साधणार असल्याचे समजते.

नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सहभागी होणार आहेत. या दरम्यान ते नागपूर आणि भंडारा जिल्हा पालथा घालून जनतेशी संवादसुद्धा साधणार असल्याचे समजते. 

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वात एक ऑगस्टपासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधिस्थळ असलेल्या गुरुकुल मोझरी येथून महाजनादेश यात्रेला सुरवात होणार आहे. राज्यातील एकूण १५० मतदारसंघांतून ही यात्रा प्रस्तावित आहे. या दरम्यान राज्य शासनाने पाच वर्षांत केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला जाणार आहे. यात्रेचा समारोप नाशिक येथे होणार असून यास पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. 

अमित शहा मोझरी येथे महाजनादेश यात्रेचे उद्‌घाटन करतील. त्यानंतर नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील यात्रेत सहभागी होणार असल्याचे समजते. केंद्र व राज्य सरकारच्या उपलब्धी जनतेसमोर मांडण्याकरीता महाजनादेश यात्रा काढण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीकरिता या यात्रेचा उपयोग होईल, अशी पक्षाला अपेक्षा आहे. त्यामुळेच दिग्गज नेते या यात्रेत सहभागी होण्याकरिता उत्साही आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amit Shah Janadesh Yatra Public Discussion Chief Minister