हिपेटायटिसविरोधी मोहिमेसाठी अमिताभ सदिच्छा दूत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 मे 2017

'डब्ल्यूएचओ'चा निर्णय; राज्यात मोफत तपासणी मोहीम राबविण्याचा विचार

'डब्ल्यूएचओ'चा निर्णय; राज्यात मोफत तपासणी मोहीम राबविण्याचा विचार
मुंबई - जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांना हिपेटायटिसविरोधी मोहिमेसाठी डब्ल्यूएचओचा सदिच्छा दूत जाहीर केले. अमिताभ यांनी सूचविल्यानुसार महाराष्ट्र सरकारच्या मदतीने मोफत तपासणी मोहीम प्रायोगिक तत्त्वावर राबवण्याबाबत विचार सुरू आहे.

भारतात हिपेटायटिसचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळतात. यासाठी पंजाबमध्ये राबवलेली मोहीम भारतभर राबविण्याची आवश्‍यकता आहे, असे मत जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रतिनिधींनी जे. डब्ल्यू. मॅरिएट हॉटेलमध्ये झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केले.

हिपेटायटिसचे उपचार आणि औषधे अत्यंत महागडी आहेत. तीन महिन्यांच्या उपचारांसाठी अमेरिकेत 85 हजार डॉलर, इंग्लंडमध्ये 55 हजार डॉलर आणि भारतात जवळपास 120 डॉलर खर्च होतात. इतर देशांच्या तुलनेत भारतातील खर्च कमी असला, तरी भारतीयांना हा खर्च परवडणार नाही. तो कमी करण्यासाठी आणि औषधे सर्वत्र उपलब्ध व्हावीत, यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याची माहिती दक्षिण पूर्व आशिया विभागीय संचालिका डॉ. पूनम खेत्रपाल सिंग यांनी "सकाळ'ला दिली. हिपेटायटिसवरील उपचार महागडे असले, तरी अत्यावश्‍यक आहेत. याकडे दुर्लक्ष केल्यास यकृत प्रत्यारोपणाची वेळ ओढवू शकते. त्यासाठी येणारा खर्च औषधोपचारांपेक्षा अधिक खर्चिक आहे.

डब्ल्यूएचओचे प्रतिनिधी डॉ. हेन्क बॅकडम आणि डॉ. पूनम खेत्रपाल सिंग यांनी सांगितले, की भारतात फक्त 10 टक्के रुग्ण यासाठीची चाचणी करत असल्याने तेवढेच रुग्ण समजतात. भारतातील हिपेटायटिसच्या रुग्णांचा निश्‍चित आकडा समजलेला नाही, असे बॅकडम यांनी सांगितले. इतर आजारांवरील उपचार घेताना हा आजार झाल्याचे अनेक रुग्णांना नंतर लक्षात येते, असे ते म्हणाले.

पंजाबात सर्वाधिक रुग्ण
अमली पदार्थांचे व्यसन मोठ्या प्रमाणावर जडलेल्या ठिकाणी हिपेटायटिसचे रुग्ण जास्त आढळतात. भारतात पंजाबमध्ये असे सर्वाधिक रुग्ण आढळतात. यासाठी पंजाब सरकारने मोफत तपासणी आणि उपचारांची मोहीम राबविल्यानंतर तिथे हिपेटायटिसचे 27 हजार रुग्ण आढळले होते. त्यापैकी 93 टक्के रुग्ण उपचारांनंतर संसर्गमुक्त झाले. यासाठी पंजाब सरकारने डिस्पोसेबल इंजेक्‍शनचा प्रयोग राबविला. कंपन्या अशा इंजेक्‍शनची निर्मिती मोठ्या प्रमाणावर करत आहेत. भारत सरकार हा प्रयोग देशभरात राबविण्यासाठी सकारात्मक असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

रुग्णांची संख्या अनिश्‍चित
भारतात हिपेटायटिसच्या अनेक कारणांपैकी रक्त तपासणीतील अडथळे हे एक कारण आहे. वैद्यकीय उपकरणे स्वच्छ न केल्यामुळेही हिपेटायटिसला निमंत्रण ठरते. हा विषाणू बराच काळ शरीराबाहेर राहू शकतो. भारतात "हिपेटायटिस सी'चे प्रमाण कमी आहेत. मात्र रुग्णांचा नेमका आकडा अद्याप समजू शकलेला नाही, कारण इथे तपासणीचे प्रमाणही कमी आहे, असे हेन्क यांनी सांगितले.

भारतात हिपेटायटिसबरोबरच क्षय, हिवताप, कर्करोग, एचआयव्हीचे रुग्णही मोठ्या प्रमाणावर आढळतात. या आजारांनी होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही मोठे आहे. उष्णकटिबंधीय आजारांवर भारतात विशेष काम झालेले नाही. हिपेटायटिस हा त्यापैकी एक आजार असल्याने त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यासाठी प्रयत्न आवश्‍यक आहेत.
- डॉ. पूनम खेत्रपाल सिंग, दक्षिण पूर्व आशिया विभागीय संचालिका

धोकादायक हिपेटायटिस
1 लाख 40 हजार - हिपेटायटीसने जगभरात होणारे मृत्यू
3 कोटी 50 लाख - "हिपेटायटीस बी'चे भारतातील रुग्ण
60 लाख - "हिपेटायटीस सी'चे भारतातील रुग्ण
Web Title: amitabh bachchan selfie with hepatitis campaign employee