Andheri By-Election: ऋतुजा लटके आणि मुरजी पटेलांकडे किती आहे संपत्ती? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Andheri By-Election

Andheri By-Election: ऋतुजा लटके आणि मुरजी पटेलांकडे किती आहे संपत्ती?

Rutuja latke and Murji Patel: मुंबईतली अंधेरी पूर्व पोटनिवडणूक आता प्रतिष्ठेची झालीय. दोन्ही पक्षांकडून कमालीची ताकद लावली जातेय. भाजपकडून मुरजी पटेल हे रिंगणात आहेत तर उद्धव ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आलीय. दोन्ही उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय.

निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये लटके आणि पटेल यांच्याकडे किती संपत्ती आहे, हे स्पष्ट झालंय. प्रतिज्ञापत्रानुसार मुरजी पटेल यांच्याकडे १० कोटी ४१ लाख रुपयांची संपत्ती आहे. तर ऋतुजा लटके यांच्याकडे ४३ लाख ८९ हजार ५०४ रुपयाची जंगम मालमत्ता आहे.

प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार ऋतुजा लटके यांच्यासह मुलांच्या नावावर १२.३५ एक्कर जमीन आहे. त्यांच्याकडे केवळ ७५ हजार रुपयांची रोख रक्कम आहे. लटकेंच्या नावावर १५ लाख २९ हजार रुपये गृहकर्ज आहे. तर ५१ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. पती स्व. रमेश लटके यांच्या नावावरील संपत्ती ऋतुजा लटके यांच्या नावावर अद्याप झालेली नाही. ऋतुजा लटके या पदवीधर आहेत.

दुसरीकडे भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांचं शिक्षण नववीपर्यंत झालं आहे. प्रतिज्ञापत्रानुसार पटेल यांच्याकडे १० कोटी ४१ लाख रुपयांची मालमत्ता आहे. यात ५ कोटी ४१ लाख रुपये मुरजी पटेल यांच्या नावावर आहेत. तर पाच कोटींची संपत्ती त्यांच्या मुलांच्या नावे आहे. गुजरातमधील कच्छ येथे पटेल यांच्याकडे ३० एक्कर जमीन आहे. तर मुंबईतल्या अंधेरी भागात मुरजी यांच्या नावावर तीन सदनिका आहेत.

भाजप आणि ठाकरे गट थेट लढत असल्याने दोन्ही पक्षांकडून जोरात निवडणूक प्रचार सुरु आहे. दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी पक्षातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. परंतु मतदार कुणाच्या पारड्यात मतं टाकतात, हे लवकरच स्पष्ट होईल.