शरद पवारांचे धक्कातंत्र; 'या' विश्वासू नेत्याला दिले गृहमंत्री पद?

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 December 2019

गृहमंत्रीपदावर अनेकांनी दावा केला असतानाच राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी मात्र धक्कातंत्राचा वापर करत नव्या नेत्याच्या हाती गृहमंत्रीपदाची धुरा सोपविण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. 

मुंबई : राज्यातील महाविकासआघाडी सरकारमधील मंत्रिमंडळाचा आज (सोमवार) पहिल्यांदा विस्तार झाला, या विस्तारानंतर गृहमंत्री पद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गृहमंत्रीपदावर अनेकांनी दावा केला असतानाच राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी धक्कातंत्राचा वापर करत नव्या नेत्याच्या हाती गृहमंत्रीपदाची धुरा सोपविण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गृहमंत्रिपदासाठी अनिल देशमुख यांच्या नावाची चर्चा असून अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील आदी नेत्यांना डावलून अनिल देशमुख यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. गृहमंत्रीपदासाठी  दिलिप वळसे पाटील यांच्या नावाचीही चर्चा होती.

उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार म्हणतात, 'गांभीर्यपूर्वक...

अनिल देशमुख हे पहिल्यांदा १९९५ साली आमदार झाले. त्याआधी नागपूर जिल्हा परिषदेचे ते अध्यक्ष होते. राष्ट्रवादीचा ते विदर्भातला चेहरा असून गेल्या वेळी पुतण्या आशिष देशमुखने भाजपकडून लढून त्यांना पराभूत केले पण त्यानंतर सतत संपर्क ठेवून त्यांनी काटोल विधानसभा मतदारसंघातून बाजी मारली. स्वच्छ प्रतिमा तसेच पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाचे ओझे नसल्याने शरद पवार त्यांच्यावर सर्वाधिक महत्वाच्या खात्या जबाबदारी सोपविणार असल्याचे बोलले जात आहे. अनिल देशमुख यांनी युतीच्या सरकारात सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून महत्वाचे कार्यक्रम आग्रहाने नागपुरात केले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात अन्न व नागरी पुरवठा या खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी कारभार पाहिला. ते पुण्याचे जावई आहेत.

मंत्रिमंडळात एक मराठा लाख मराठा; निम्म्याहून अधिक मंत्री मराठा

तत्पूर्वी, तत्पूर्वी, राज्यातील महाविकासआघाडी सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून, उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शपथ घेतली. यावेळी 25 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्र्यांनीही शपथ घेतली. राजभवनात झालेल्या भव्य कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी सर्व मंत्र्यांना शपथ दिली. राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकारचा आज पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. या विस्तारात शिवसेनेचे 13, राष्ट्रवादीचे 13 आणि काँग्रेसचे 10 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार यावर आज सकाळी शिक्कामोर्तब झाले. या कार्यक्रमाला शपथ घेतलेले मंत्री आपल्या कुटुंबीयांसह हजर होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anil Deshmukh may Home Minister of Maharashtra State