esakal | मंत्री अनिल परब म्हणतात, एसटीच्या खाजगीकरणाचा कुठलाही प्रस्ताव नाही
sakal

बोलून बातमी शोधा

anil parab

मंत्री परब म्हणतात, एसटीच्या खाजगीकरणाचा कुठलाही प्रस्ताव नाही

sakal_logo
By
अनिल जमधडे

औरंगाबाद: एसटीच्या कुठल्याही खाजगीकरणाचा विषय नाही. मात्र दर्जेदार सेवा देण्यासाठी बस भाड्याने घेण्याच्या बरोबरच नविन बस बांधणी करण्यात येणार आहे. पुर्ण क्षमतेने बससेवा चालवण्याचा प्रयत्न असल्याचे परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी स्पष्ट केले. ईडीच्या लावण्याच्या संदर्भात विरोधकांना काय आरोप करायचेत ते करु द्या, मी ज्यांना उत्तर द्यावयाचे त्यांना देईल अशा शब्दात श्री. परब यांनी विरोधकांचा समाचार घेतला. मंत्री पदाचा पदभार घेतल्यानंतर पहिल्यांदाच शुक्रवारी (ता. १६) श्री. परब यांनी औरंगाबादेत भेट दिली.

एसटी महामंडळाच्या चिकलठाणा कार्यशाळेला भेट दिल्यानंतर श्री. परब यांना पत्रकारांनी गाठले, त्यानंतर त्यांनी भूमिका स्पष्ट केली. यावेळी विभाग नियंत्रक अरुण सिया, सुरक्षा अधिकारी माणिकराव केंजळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. ॲड. परब म्हणाले की, कोरोनामुळे गेल्या पावणेदोन वर्षात एसटीचे उत्पन्न घटले आहे. आता परिस्थिती पुर्वपदावर येत आहे. त्यामुळेच एसटी पुर्ण क्षमतेने चालवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहे. एसटीने यापुढे केवळ प्रवाशांवर अवलंबून न राहता उत्पन्न वाढीचा प्रयत्न सुरु केला आहे. त्याचाच भाग म्‍हणून माहाकार्गोच्या माध्यमाने मालवाहतूक सुरु केली आहे. पुर्वी एसटीसाठी असलेले पेट्रोल पंप, टायर रिमोल्डींग प्रकल्प जनतेसाठी सुरु करण्यात येत आहेत. विविध मार्गाने एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न सुरु आहे. ही परिस्थिती सुधारुन एसटीला पुन्हा चांगले दिवस येतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा: 'पीक कर्ज देण्यास बँकेने टाळाटाळ केली तर मला कॉल करा'

डिझेल दरवाढीमुळे एसटीवर दोन कोटी रुपयांचा अतिरिक्त भार येत आहे. त्यामुळेच आगामी काळात तिकीट दरवाढीचा पर्याय समोर दिसत आहे. यासंदर्भात मंत्रीमंडळात चर्चा करुन निर्णय घेतला जाणार असल्याचे श्री. परब यांनी स्पष्ट केले. एसटीतील कर्मचाऱ्यांचे वेतन हे वेतन करारानुसार होते, त्यामुळेच एसटी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग देता येणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. एसटीच्या ताफ्यातील साडेतीन हजार बसेस बाद होणार आहे, त्यामुळे बसेस भाड्याने घेण्याच्या बरोबरच नविन बसची बांधणीही केली जाणार आहे. यापुर्वीही बस भाड्याने घेतलेल्याच आहेत, मुळात प्रवाशांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कार्यशाळेचे व्यवस्थापक किशोर सोमवंशी यांनी कार्यशाळेची रचना आणि बसची बांधणी कशी होते यासंदर्भात माहिती दिली.

परिवहनमंत्र्यांचा प्रवाशासोबत संवाद
बसेस वेळेवर धावतात का, चालक-वाहक चांगली वागणुक देतात का, असे प्रश्न विचारत परिवहनमंत्री अनिल परब यांनी मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवाशांसोबत संवाद साधला.
बसस्थानकात विभाग नियंत्रण अरुण सिया यांनी माहिती माहिती दिली. यावेळी शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, नगरसेवक मनोज गांगवे यांनी परिवहनमंत्र्यांचे स्वागत केले. तर महिला कर्मचाऱ्यांनी औक्षण केले.

हेही वाचा: हुश्श..! दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर आज संपली

लाचखोर अधिकाऱ्यावर कारवाई अटळ
औरंगाबाद आरटीओ कार्यालयात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल माने व त्यांचा सहाय्यक लाचेच्या जाळ्यात अडकले आहेत. या प्रकरणात लाचखोर अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही अशी भुमिका ॲड परब यांनी स्पष्ट केली.

loading image