
Anil Parab : "नाक घासून माफी मागावी लागेल किंवा…"; अनिल परबांनी सांगितलं सोमय्यांनी याचिका मागं घेतल्याचं कारण
दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून सातत्याने आरोप करण्यात येत होते. यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी हरित लवादामध्ये दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे. यानंतर अनिल परब यांनी आज, २९ मे पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्या यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
अनिल परब म्हणाले की, सुरुवातीपासून सांगत होतो की साई रिसॉर्टशी माझा काही संबंध नाही. हे माझ्या मित्राचं आहे. मी त्याला जागा विकली होती. पण जाणूनबुजून माझ्यावर खोटे आरोप केले गेले. गेले दीड वर्षे याप्रकरणात माझी नाहक बदनामी केली गेली. यासंदर्भात मी माझ्या बदनामीचा खटला हायकोर्टात दाखल केला आहे.
परब पुढे बोलताना म्हणाले की, मी सांगत आलोय की या आरोपात काही तथ्य नाही. किरीट सोमय्या त्यांच्या सवयीप्रमाणे खोटे आरोप करत आहेत. हायकोर्टात केस होती तर हरित लवादात केस कशाला केली? आरोप करून सोडून द्यायचे आणि मग अशी प्रकरणे अंगलट येतंय असं दिसलं की ती मागे घ्यायची.
हरित लवादासमोर सुनावणीसाठी जेव्हा हे प्रकरण आलं तेव्हा या प्रकरणात काही तथ्य नाही, आम्ही हे प्रकरण डिसमिस करत करतो असं जेव्हा न्यायमूर्तींनी सांगितलं, तेव्हा प्रकरण डिसमीस झालं तर आपली अब्रू जाईल म्हणून किरीट सोमय्या यांनी ही याचिका मागे घेतली आहे असे परब म्हणाले.

नाक घासून माफी मागावी लागेल
"माझी खात्री आहे एकदिवस किरीट सोमय्यांना नाक घासून माफी मागावी लागेल किंवा मी दावा केलेले १०० कोटी द्यावे लागतील" असेहीअनिल परब यावेळी म्हणाले.