साखर कारखान्यांप्रकरणी अण्णा हजारेंची लेखी तक्रार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

मुंबई - सहकारी साखर कारखान्यांतील 25 हजार कोटींच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांकडे तक्रार केली आहे.

मुंबई - सहकारी साखर कारखान्यांतील 25 हजार कोटींच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांकडे तक्रार केली आहे.

साखर कारखान्यांच्या खासगीकरणप्रकरणी हजारे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. 6 डिसेंबरला उच्च न्यायालयाने याप्रकरणी हजारे यांना स्थानिक पोलिसात तक्रार देण्याची सूचना केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अनेक राजकीय नेते सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अण्णा हजारे यांनी आज वकील सतीश तळेकर व काही सहकाऱ्यांसह एमआरए मार्ग पोलिस ठाण्यात येऊन 170 पानांची तक्रार दिली. सुरवातीला ही तक्रार मुंबई पोलिस आयुक्तांकडे देण्यासाठी हजारे व त्यांचे सहकारी गेले होते; पण आयुक्त नसल्यामुळे ही तक्रार एमआरए मार्ग पोलिसांकडे देण्यात आली.

तक्रारीत 203 पैकी 48 कारखान्यांचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. उपायुक्त (परिमंडळ-1) मनोजकुमार शर्मा यांना विचारले असता, याप्रकरणी लेखी तक्रार स्वीकारण्यात आली असून, अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Anna Hazare written complaint in case of sugar factories