राज्यातील पोलिसांच्या दिमतीला ‘थर्ड आय’ 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

गुन्हेगारीचे स्वरूप बदलत असताना पोलिसही स्वतःला स्मार्ट बनवत आहेत.

पुणे - गुन्हेगारीचे स्वरूप बदलत असताना पोलिसही स्वतःला स्मार्ट बनवत आहेत. गुन्हेगारीबद्दल खडा न्‌ खडा माहिती ठेवण्यासह नवीन घडणारे गुन्हे, आरोपींचा इतिहास, न्यायालयात सुरू असणारे खटले एका क्‍लिकवर बघण्याची सुविधा पुणे पोलिस दलात ‘थर्ड आय’ या ॲपद्वारे केली आहे. त्यामुळे पोलिसांचे काम सुकर होत असल्याने राज्याच्या पोलिस दलासाठी अशाच प्रकारचे ॲप विकसित केले जाणार आहे. त्यासाठी पुणे पोलिसांनी वायरलेस विभागाला सर्व माहिती पुरविली आहे. 

पुण्यासह राज्यातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये ‘सीसीटीएनएस’ या प्रणालीद्वारेच गुन्हे दाखल केले जात आहेत. हे काम ऑनलाइन असले तरी प्रत्येक पोलिसाला याबद्दल माहिती नसते. गुन्हेगारांची, आरोपींची माहिती लेखी स्वरूपात आहे, न्यायालयात कोणते खटले सुरू आहेत? कोणता गुन्हेगार जामिनावर बाहेर सुटणार आहे? कोणाची शिक्षा पूर्ण झाली आहे? घडणारे गुन्हे, गुन्हे करणाऱ्यांचा वयोगट, स्थळ यासह अनेक माहिती पोलिसांकडे असते. याचे विश्‍लेषण मोजकेच पोलिस करत असतात. अनेकांना त्यांच्या हद्दीच्या बाहेर काय घडले आहे, हे माहिती नसते. 

गुन्हेगारी कमी करण्यासाठी या माहितीचे विश्‍लेषण करून, त्याचा काम करताना उपयोग करता आला पाहिजे, यासाठी पुण्याचे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी एका खासगी कंपनीकडून ‘थर्ड आय’ हे ॲप विकसित करून घेतले. गेल्या काही महिन्यांपासून याचा शहरामध्ये वापर केला जात आहे. या ॲपची राज्यातील पोलिसांनाही मदत होऊ शकते. त्यासाठी या ॲपचे तंत्रज्ञान वायरलेस विभागाला देऊन संपूर्ण राज्यासाठी एक ॲप तयार केले जाणार आहे. याबाबत वायरलेस विभागाच्या अधिकाऱ्यांनीही अशा प्रकारचे  ॲप तयार करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, असे सांगितले. 

पुणे पोलिसांनी तयार केलेल्या ‘थर्ड आय’ ॲपमुळे अनेक कामे सोपी होणार आहेत. ऑनलाइन सर्व माहिती पोलिसांना मिळत आहे. हे मॉडेल राज्यात राबविण्यासाठी शहरात ही माहिती वायरलेस विभागाला दिली आहे.
- डॉ. के. व्यंकटेशम, पोलिस आयुक्त, पुणे  

ॲपची वैशिष्ट्ये 
  प्रत्येक पोलिसाला स्वतःचे युजरनेम व पासवर्ड
  गुन्ह्यांचे विश्‍लेषण आपोआप होणार 
  गुन्हे कोणत्या वेळेत जास्त घडतात, याची माहिती 
  गुन्हेगारांचा वयोगट कळणार 
  तडीपार, बेपत्ता, न्यायालयीन तारखा कळणार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: App for Maharashtra police