तुम्ही हेडमास्तर आहात की रिमोट कंट्रोल? आता मिळालं उत्तर, कारण शरद पवार म्हणतात, मी....

प्रशांत बारसिंग
शनिवार, 11 जुलै 2020

संजय राऊत यांनी नुकतीच महाराष्ट्रातील सर्वात जेष्ठ नेते, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुलाखत घेतली.

मुंबई - संजय राऊत यांनी नुकतीच महाराष्ट्रातील सर्वात जेष्ठ नेते, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुलाखत घेतली. खरंतर या मुलाखतीच्या प्रोमोवरूनच मोठ्या प्रमाणात राजकीय प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. या प्रोमोमध्ये संजय राऊत शरद पवारांना एक प्रश विचारताना पाहायला मिळतायत. हा प्रश्न आहे तुम्ही हेडमास्तर आहात की रिमोट कंट्रोल? आता याचं उत्तर आता सर्वांना मिळालंय. 

संजय राऊत यांनी शरद पवारांना तुम्ही हेडमास्तर आहात की रिमोट कंट्रोल? असा प्रश्न केला असता पवार म्हणाले की, दोन्ही नाही. हेडमास्तर असला तर तो शाळेत असायला हवा. लोकशाहीत सरकार किंवा प्रशासन हे रिमोटने कधी चालत नाही.  मुलाखतीत शरद पवार म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीत फरक आहे. पण मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे उत्तम काम करीत आहेत. महाराष्ट्र या कोरोनाच्या संकटातूनही बाहेर पडेल व झेप घेईल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : "...त्यावेळी बाळासाहेबांनी आम्हाला धक्का बसेल अशी भूमिका घेतली", बाळासाहेबांबद्दल असं का म्हणालेत शरद पवार ?

राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्याचे पवार यांनी म्हटले आहे. हा प्रयोग आणखी यशस्वी होऊन या प्रयोगाची फळे महाराष्ट्रातील जनतेला, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागाला मिळताहेत अशी स्थिती आपल्याला नक्कीच बघायला मिळाली असती. पण हे कोरोनाचे संकट आले हे दुर्दैव आहे. गेले काही महिने राज्य प्रशासन आणि राज्यकर्ते आणि राज्याची संपूर्ण यंत्रणा फक्त एकाच कामात गुंतलेली आहे, त्यामुळे बाकीचे सगळे प्रश्न बाजूला राहिले.

हेही वाचा : 2019 च्या विधानसभा आणि 'भाजप'बाबत शरद पवारांचं 'मोठं' वक्तव्य, शरद पवार म्हणालेत... 

तिन्ही पक्ष एका विचारानं मुख्यमंत्री ठाकरेंच्या पाठीशी

शरद पवार म्हणाले की, कोरोनाच्या संकटात सगळे जण एका विचाराने मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पाठीशी आहेत. आम्ही त्यांच्या धोरणाच्या पाठीशी आहोत आणि या परिस्थितीला तोंड देत आहोत. त्यामुळे माझी खात्री आहे की या तिन्ही पक्षांत यत्किंचितही नाराजी नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.

( संकलन -  सुमित बागुल )

are you headmaster or remote control sharad pawar answers i am none of this


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: are you headmaster or remote control sharad pawar answers i am none of this