"...त्यावेळी बाळासाहेबांनी आम्हाला धक्का बसेल अशी भूमिका घेतली", बाळासाहेबांबद्दल असं का म्हणालेत शरद पवार

प्रशांत बारसिंग
शनिवार, 11 जुलै 2020

शरद पवारांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल देखील आपलं मत मांडलंय.

मुंबई : संजय राऊत यांनी शरद पवारांची नुकतीच प्रदीर्ध  मुलाखत केली. त्याचा पहिला भाग आज प्रसिद्ध झालाय. यामध्ये शरद पवारांनी अनेक विषयांवर दिलखुलासपणे आपलं मत मांडलाय. शरद पवारांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल देखील आपलं मत मांडलंय. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलताना शरद पवार म्हणालेत...     

"मला जे बाळासाहेब ठाकरे माहीत आहेत, माझ्यापेक्षा तुम्हा लोकांना कदाचित अधिक माहिती आहेत. पण बाळासाहेबांची संबंध विचारधारा, कामाची पद्धत ही भारतीय जनता पक्षाच्या विचाराशी सुसंगत होती असे मला कधी वाटलंच नाही. बाळासाहेबांची भूमिका आणि भाजपच्या विचारधारेत अंतर होते. बाळासाहेबांची विशेषतः कामाच्या पद्धतीत जमीन-अस्मानाचा फरक आहे. बाळासाहेबांनी सन्मान केला तो काही व्यक्तींचा केला. त्यांनी अटलबिहारी वाजपेयींचा केला, त्यांनी आडवाणींचा केला, त्यांनी प्रमोद महाजनांचा सन्मान केला. या सगळ्यांना त्यांनी सन्मानाने वागणूक देऊन त्यातून एकत्र येण्याचा विचार केला. पुढे सत्ता येण्यात हातभार लावला. बाळासाहेब यांचा काँग्रेसशी संघर्ष होता, पण तो काही कायमचा संघर्ष नव्हता.

पुनःश्च लॉकडाऊन : १९ जुलैपर्यंतच्या लॉकडाऊनमध्ये 'या' गोष्टी राहणार सुरु, 'या' राहणार बंद

शिवसेना ही काँग्रेसच्या कायमचीच विरोधात होती असे नाही. बाळासाहेब जितके रोखठोक तितकेच दिलदार होते,  राजकारणात ही अशी दिलदारी दुर्मिळ आहे. कदाचित बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना ही या देशातील एकमेव संघटना अशी असेल की एखाद्या राष्ट्रीय प्रश्नावरून सत्ताधारी पक्षातल्या प्रमुख लोकांना स्वतःच्या पक्षाच्या भवितव्याची काय स्थिती होईल याची यत्किंचितही तमा न बाळगता पाठिंबा द्यायचे. 

आणीबाणीच्या काळातदेखील इंदिरा गांधींच्या विरोधात देश होता त्या वेळेला शिस्त आणण्याचा फैसला करणारे नेतृत्व म्हणून बाळासाहेब इंदिरा गांधींसोबत उभे राहिले. नुसतेच उभे राहिले नाहीत तर आम्हाला सगळ्यांना धक्काच बसावा अशी भूमिका त्यांनी घेतली होती. तेव्हा बाळासाहेब म्हणाले होते की, "महाराष्ट्राच्या निवडणुकीत मी उमेदवारसुद्धा उभा करणार नाही. राजकीय पक्ष चालवणाऱ्यांनी मी उमेदवार उभा करणार नाही असे म्हणून त्या संघटनेचे नेतृत्व टिकवणे ही काही साधी गोष्ट नाही, पण ते बाळासाहेब ठाकरे जाणोत आणि त्यांनी ते केले", असे पवार म्हणाले.  

मोठी बातमी : कोरोनाच्या बाबतीत मुंबई 'अंडर कंट्रोल', पण सावधान कारण..

काँगेसच्या संदर्भात त्यांच्या मनात विद्वेष नव्हता. काही धोरणांसंबंधी स्पष्ट मते होती. त्यामुळे तो एक वेगळा पैलू त्यावेळी पाहायला मिळाला आणि आज कमीजास्त प्रमाणात त्याच मार्गाने उद्धव ठाकरे चाललेत असे म्हणायला हरकत नाही, असेही पवार म्हणाले.

( संकलन - सुमित बागुल )

how sharad pawar looks at balasaheb thackeray as politician and as human being


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: how sharad pawar looks at balasaheb thackeray as politician and as human being