तुम्ही बोर्डाची परीक्षा देताय का? ‘त्रिसूत्री’चा अवलंब करा अन्‌ मिळवा चांगले गुण

आता परीक्षा काही दिवसांवर असताना चिंता नको, काटेकोर नियोजन हवे. वेळापत्रक तयार करून नोट्‌स काढल्या, लिखाणाचा सराव केला आणि मॉडेल पेपर्सचा अंदाज घेऊन सराव केल्यास निश्चितपणे चांगले गुण मिळतील, असा विश्वास शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
10th and 12th Students exam
10th and 12th Students examsakal

सोलापूर : अभ्यास नक्की कसा आणि कुठून सुरु करायचा, या प्रश्नांचे उत्तर शोधताना विद्यार्थ्यांना परीक्षेचीच भीती वाटू लागते. वर्षभरात शिकवलेले लक्षात राहील ना आणि परीक्षेत नीट लिहू शकू का, याचीही चिंता विद्यार्थ्यांना असते. काहीजण विषय समजून न घेता पाठांतरावरच भर देतात. मात्र, आता परीक्षा काही दिवसांवर असताना चिंता नको, काटेकोर नियोजन हवे. वेळापत्रक तयार करून नोट्‌स काढल्या, लिखाणाचा सराव केला आणि मॉडेल पेपर्सचा अंदाज घेऊन सराव केल्यास निश्चितपणे चांगले गुण मिळतील, असा विश्वास शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

१) अभ्यासाचे नियोजन काटेकोरपणे पाळा

परीक्षेची तयारी करताना दिनचर्या खूप महत्वाची बाब असून त्याचे काटेकोर नियोजन ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. अभ्यासासाठी तयार केलेल्या वेळापत्रकानुसार दिनचर्या असावी. बरेच विद्यार्थी नियमित योजना बनवतात, परंतु त्याचे पूर्णपणे पालन करत नाहीत. आज नको, उद्या बघू म्हणण्यातच त्यांचा वेळ निघून जातो. त्यामुळे अभ्यासक्रम अपूर्ण राहतो आणि परीक्षेच्या शेवटी तयारीचा दबाव वाढतो. त्यांना अभ्यासक्रमाची उजळणीही करता येत नाही. म्हणूनच नियोजन आणि त्याची अंमलबजावणी अतिशय महत्त्वाची आहे.

२) मॉडेल पेपर्स सोडवा, नोट्‌स काढा

परीक्षेच्या सरावासाठी प्रत्येक विषयांचे विशेषत: तुम्हाला कठीण वाटणाऱ्या विषयांचे मॉडेल पेपर्स सोडवा. हे वेळोवेळी करणे म्हणजे आपली तयारी अधिक धारदार बनविण्यासारखेच आहे. कठीण विषयातील महत्वाच्या संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येतील. तसेच परीक्षेत कोणते प्रश्न वर्णावर विचारले जातात, त्यावर तुम्हाला लक्ष देता येईल. तर प्रत्येक विषयांच्या स्वत: नोट्‌स काढा. वर्णनात्मक प्रश्नांचे मुद्दे लिहून त्याची उत्तरे सतत वाचा. परीक्षेला जाताना केवळ नोट्‌समधील मुद्दे वाचले तर त्यातील वर्णन निश्चितपणे लक्षात राहील. पहाटेच्या सुमारास अभ्यास करावा. परीक्षेत प्रत्येक प्रश्न अचूक व आवर्जुन सोडवा.

३) उत्तरे लिहिण्याची प्रॅक्टिस करा

यंदा बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत. शाळा तेथे केंद्रे पण नसतील. त्यामुळे पेपर वेळेत सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी लेखनाचा वेग वाढवणे आवश्यक आहे. बोर्डाच्या परीक्षांची तयारी सुरू करताच उत्तर लिहिण्याचा सराव सुरू केला पाहिजे. हे तुम्हाला वेळ आणि परीक्षेचा दबाव कसा मॅनेज करायचा हे समजण्यास मदत करेल. त्यामुळे पेपर लवकर सोडवता येईल आणि काय राहिले का, चुकीचे काही लिहिले गेले का, याची पडताळणी करता येईल. त्यातून चांगले गुण (टक्केवारी) मिळतील.

परीक्षा काळातील मनापासून केलेला अभ्यास तुमचे आयुष्य बदलणारा ठरेल. त्यामुळे परीक्षेपूर्वी चांगला अभ्यास करा. मोबाइल बाजूला ठेवा. टिव्हीपासून काही दिवस दूर राहा. छंद जोपासा, पण वेळ वाया घालवू नका.

प्रश्नपत्रिकांचा सराव खूप महत्वाचा

परीक्षा तोंडावर असून विद्यार्थ्यांनी भीती न बाळगता अभ्यास करावा. दररोज विषयनिहाय पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करावा. विद्यार्थ्यांनी सरसकट विस्तृत अभ्यासाचा लोड न घेता त्या विषयांमधील महत्वाच्या प्रकरणांवर लक्ष केंद्रित करावे.

- डॉ. सुरेश ढेरे, प्राचार्य, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com