Raosaheb Danve
Raosaheb Danve

Loksabha 2019 : दानवेंच्या उमेदवारीत खोतकरांचा खोडा 

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जालन्याची जागा भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रतिष्ठेची झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची उमेदवारी जाहीर करण्याच्या आड शिवसेनेचे जालन्यातील नेते अर्जुन खोतकर शड्डू ठोकून उभे आहेत. जालना लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेकडे घ्यावी अन्यथा रावसाहेब दानवे यांच्या विरोधात मैत्रीपूर्ण लढतीचे आव्हान देत अजूनही निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतली नसल्याचे खोतकर यांनी स्पष्ट करीत दानवे यांच्यावर टांगती तलवार कायम ठेवली. 

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जालनाच्या जागेबाबतचा संभ्रम अद्याप सुटलेला नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमवेत उद्या औरंगाबादला अर्जुन खोतकर यांची पुन्हा एकदा बैठक होणार आहे. त्यानंतरच निर्णय घेणार असल्याचे खोतकर यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. जालन्यात भाजप आणि शिवसेनेत स्थानिक राजकारण तीव्र टोकाला गेले असल्याने जालन्यामध्ये शिवसेना टिकवण्यासाठी जालन्याची जागा शिवसेनेलाच मिळावी, असा आग्रह अर्जुन खोतकर यांनी लावून धरला आहे. या जागेसंदर्भात आज "मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे आणि अर्जुन खोतकर यांच्यात बैठक झाली. 

"मातोश्री'वरील बैठकीनंतरदेखील खोतकर यांनी ही जागा शिवसेनेलाच मिळावी, असा पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आग्रह धरला. या जागेची अदलाबदल करावी. तसे जर होत नसेल, तर जालनामध्ये मैत्रीपूर्ण लढत करण्यास तयार असल्याचे सांगत रावसाहेब दानवे यांना पुन्हा एकदा आव्हान दिले. त्याचबरोबर कॉंग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांची भेट घेतल्याची चर्चा होती. त्यामुळे खोतकर कॉंग्रेसमध्ये जाणार असल्याचेही बोलले जात असले, तरी अद्याप याविषयी कोणताही निर्णय घेतला नसल्याचे त्यांनी या बैठकीनंतर "सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले. 

दबाव आणण्यास सुरवात 
अर्जुन खोतकर यांनी गेल्या दोन वर्षांत लोकसभा निवडणूक लढविण्याच्या दृष्टीनेच मतदारसंघाची बांधणी केली आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये स्थानिक राजकारण तीव्र शहकाटशहाचे राहिल्याने स्थानिक कार्यकर्तेदेखील एकत्रित काम करण्यास तयार नसल्याचे बोलले जात आहे. तसेच खोतकर यांनी निवडणुकीत आव्हान उभे केल्यास दानवे यांच्यासमोरील अडचणी वाढणार आहेत. खोतकर यांच्या सहकार्याशिवाय ही लढत कठीण असल्यानेच दानवे यांनी वरिष्ठ पातळीवरून खोतकर यांच्यावर दबाव आणण्यास सुरवात केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com